पुणे | 28 सप्टेंबर 2023 : घर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती…या कवितेप्रमाणे एक घर घेण्याचे स्वप्न प्रत्येक सामान्यांचे असते. त्यात पुणे शहरातील वातावरण आणि इतर सुविधा चांगल्या असल्यामुळे या ठिकाणी घरे घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. पुणे शहरात शैक्षणिक सुविधा आणि रोजगाराच्या अनेक संधी आहेत. तसेच घरे बजेटमध्ये मिळत आहे. यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून गेल्या अनेक महिन्यांपासून व्याजदारात कपात केली गेली नाही, त्यानंतर पुणे शहरात घरांची मागणी वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांत घरांना कुठे अन् किती मागणी आली, ही माहिती समोर आली आहे.
गेल्या तीन महिन्यात म्हणजे जुलै ते सप्टेंबर देशभरात विक्रमी घरांची विक्री झाली आहे. या तीन महिन्यांत मागील वर्षाच्या तुलनेत 36 टक्के घरांची विक्री वाढली आहे. तब्बल 1 लाख 20 हजार 280 घरांची विक्री सात प्रमुख शहरांमध्ये झाली आहे. ॲनारॉक या संस्थेने हा अहवाल दिला आहे. त्यानुसार मागील वर्षी या तीन महिन्यांत 88 हजार 230 घरांची विक्री झाली होती, ती आता 1 लाख 20 हजार 280 आहे.
ॲनारॉकच्या अहवालानुसार, जुलै-सप्टेंबर या कालावधीत सात शहरांमधील घरांच्या किंमती 11 टक्के वाढल्या आहेत. त्यात सर्वाधिक वाढ हैदराबादमध्ये 18 टक्के झाली आहे. जुलै-सप्टेंबरमधील तिमाही विक्रीत आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. या विक्रीत अपार्टमेंट, व्हिला आणि स्वतंत्र मजल्यांची विक्रीचा समावेश केला आहे.
ॲनारॉक चेअरमन अनुज पुरी यांनी सांगितले की, एकूण विक्रीत मुंबई आणि पुणे यांचा वाटा सर्वाधिक 51 टक्के आहे. भारतीय रिझव्र्ह बँकेने रेपो दरात काही बदल केला नाही. यामुळे गृहकर्जाचे दर जास्त आहे. त्यानंतरही घरांची मागणी वाढली आहे. पुण्यात घरांची विक्री 14,080 वरुन 22,885 झाली आहे. ही वाढ टक्केवारीत 63 टक्के आहे. गेल्या काही वर्षांत नागरिकांचे उत्पन्न वाढले आहे. यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये घरांची मागणी वाढली आहे. नजीकच्या भविष्यातही हा ट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा आहे.