पुणे | 24 ऑगस्ट 2023 : यंदा पावसावर अल निनोचा प्रभाव दिसत आहे. यावर्षी पावसाळा चार महिन्यांचा ऐवजी आतापर्यंत एका महिन्याचा झाला आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झालाच नाही. राज्यात ७ जून रोजी दाखल होणारा मान्सून यंदा २५ जून रोजी आला. त्यानंतर जुलै महिन्यात पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच ब्रेक घेतला आहे. या महिन्यात राज्यात अजून कोठेही मुसळधार पाऊस झाला नाही. श्रावणसरीसारखा रिमझिम स्वरुपाचा पाऊस अनेक भागांत पडत आहेत. आता पुढील पाच दिवस पावसाचा कोणताही अलर्ट पुणे हवामान विभागाने दिला नाही.
पुणे आणि राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे वातावरण नाही, असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. यामुळे पावसाचा ब्रेक ऑगस्ट महिन्यात मोठा झाला आहे. राज्यात मोसमी पावसाला पोषक परिस्थिती नाही. यामुळे पुढील पाच दिवस राज्यभरात पावसाची उघडीप राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. सध्या मोसमी पावसाचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे निघून गेले आहे.
पुणे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. सुमारे 65 टक्के कमी पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्याची पावसाची सरासरी 209.8 मिमी आहे. परंतु यंदा 73.5 मिमी पाऊस झाला आहे. आता आगामी पाच दिवस पुणे परिसरात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात कोठेही पाऊस झाला नाही. राज्यात या महिन्यात 207.1 मिमी पावसाऐवजी फक्त 86.4 मिमी पाऊस झाला. राज्यात पावसाची तूट 58 टक्के आहे.
राज्यात आतापर्यंत 692.70 मिमी पाऊस झाला आहे. राज्यात पावसाची सरासरी 741.10 मिमी आहे. राज्यात आतापर्यंत पावसाची तूट 7 टक्के आहे. कमी पाऊस झाल्यामुळे राज्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा झाला नाही. मागील वर्षी राज्यातील 22 धरणांमध्ये आतापर्यंत 86.65 टक्के पाऊस होता. यंदा 68.87 टक्के पाऊस आहे.