अभिजित पोते, पुणे : राज्यात मार्च महिना अवकाळी पावसाचा झाला आहे. मार्च महिन्यानंतर एप्रिल महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट होत आहे. आता पुणे आयएमडीने पुन्हा राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. पुणे शहरातील तापमान वाढणार आहे. तसेच पुणे शहर आणि उपनगरामध्ये तीन दिवस पावसांचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट ऑरेंज दिला आहे.
काय आहे अंदाज
पुणे शहरासह उपनगरांमध्ये तीन दिवस पावसाचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. शहरात दिवसभर ऊन तर संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण असणार आहे. यामुळे अनेकांना आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन दिवस पुणे शहराला हवामान खात्याचा येलो अलर्ट दिली आहे.
आज आणि उद्या पुणे शहरात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. पाऊस येणार असला तरी उन्हाळ्यातील वाढत्या तापमानापासून दिलासा मिळणार नाही. पुणे शहरातील उष्णतेचा पारा देखील वाढणार आहे. तापमान वाढून ४० अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दुपारच्या सुमारास शहरात तापमानाचा पारा वाढणार आहे. यामुळे पुणेकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
एक सर जोरदार #लालबाग #करिरोड #मुंबई pic.twitter.com/NI9R6yAsQM
— मी सत्या I am Satya (@satya1485jit) April 14, 2023
सोलापुरात पाऊस, जळगावात सर्वाधिक पारा
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. सोलापुरात मध्यरात्री आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला होता. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार दिवसभर ढगाळ वातावरण होते तर मध्यरात्री पाऊसाची हजेरी झाली. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत असताना काही जिल्ह्यांमध्ये तापमान वाढत आहे.
जळगाव जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद गुरुवारी करण्यात आली. तापमानाचा पारा ४१.७ अंश सेल्सिअसपर्यंत गेला होता. सकाळी ११ पासून जळगावकरांना उन्हाचा तडाखा जाणवायला लागला. दुपारी १२ वाजल्यानंतर उष्ण लहरींच्या झळा बसत होत्या.परंतु संध्याकाळी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे जळगावकरांना दिलासा मिळाला.
कुठे काय अलर्ट
राज्यात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होणार आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी म्हटले आहे की,१४ एप्रिल रोजी नगर, पुणे बीड, उस्मानाबाद, सातारा आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट आहे. तसेच धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसेच १५ आणि १६ एप्रिल रोजी काही ठिकाणी येलो अलर्ट आहे. १७ एप्रिलपासून वातावरण पुन्हा चांगले होणार आहे.