पुणे | 17 सप्टेंबर 2023 : राज्यात गणपतीच्या आगमानास आता दोन दिवस उरले आहे. एकीकडे गणरायाच्या आगमानाची जोरदार तयारी सुरु असताना अनेक जिल्ह्यांत मान्सून सक्रीय झाला आहे. शनिवारी राज्यातील अनेक भागांत पाऊस झाला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा ऑरेंज अलर्ट काही जिल्ह्यांना दिला जात आहे. १७ सप्टेंबरसाठी ठाणे, पालघर जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला असून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे.
महिन्याभराच्या विश्रांतीनंतर विदर्भात पावसाचे आगमन झाले आहे. विदर्भात वरुणराजा मेहरबान झालेला दिसत आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाचे जोरदार कमबॅक झाले आहे. नागपूर, भंडारा, अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस शनिवारी झाला. भंडारा जिल्ह्यात 24 तासांपूर्वी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. गोसीखुर्द धरणाच्या 33 गेट मधून 5 लाख 81 हजार 826 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. अमरावती जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. वाठोडा गावालगत असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक थांबली आहे.
हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात शनिवारी ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्वत्र पावसाची चौफेर फटकेबाजी सुरू झाली. मध्यरात्री जिल्ह्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. मुक्ताईनगर ते रावेर जाणारा मुख्य रस्त्यावर निंभोरा सिमजवळ नदीचे पाणी शिरल्याने रस्ता बंद झाला. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. घाटमाथ्यावर रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. सातारा, सोलापूर, नगर, औरंगाबाद, पुणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.