योगेश बोरसे, पुणे : राज्यातील राजकारणात मोठा भूकंप पुन्हा एकदा झाला आहे. वर्षाभरापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून ४० आमदारांसह एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यानंतर राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आले. या वर्षभरात अनेक राजकीय घोडामोडी राज्यातील राजकारणात घडल्या. आता पुन्हा राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांनी आपला गट तयार करत शिवसेना भाजपसोबत सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. आता अजित पवार यांच्याबरोबर कोण आहेत? अन् शरद पवार यांच्यासोबत कोण आहेत? यावर चर्चा सुरु झाली आहे.
खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते कोणासोबत जाणार आहे? हे त्यांनी स्पष्ट केले. दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, आपण अजित पवार यांच्यासोबत आहोत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेला पुणे जिल्ह्यात सुद्धा शरद पवार यांना हादरा बसला आहे.
दिलीप मोहिते यांनी सांगितले की, अजित पवार यांच्यामुळे आपली राजकीय कारकीर्द घडली आहे. माझ्या मतदार संघात अनेक विकास कामे अजित पवार यांनी मंजूर केली आहे. त्यामुळे मतदार संघाचा विकास झाला आहे. विकासासाठी मी अजित पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे, अशी भूमिका दिलीप मोहिते पाटील यांनी मांडली आहे. राज्याचा मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार होणार आहे. अजून १४ मंत्र्यांचा समावेश होणार आहे. त्यावेळी आपल्याही नावाचा विचार होणार असल्याचे दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.
रविवारी दुपारी राज्याच्या राजकारणात मोठा बदल झाला. सकाळपासून अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक सुरु होती. त्यानंतर दुपारी १ वाजेनंतर मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्या. अजित पवार अन् त्याचे समर्थक राजभवनाकडे रवाना झाले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार गट वेगळा झाला अन् शिवसेना-भाजप सरकारमध्ये आल्याचे स्पष्ट झाले.
हे ही वाचा
पुणे येथील मोतीबागेत शरद पवार यांच्यासोबत कोण? पवारांसोबत दिसला फक्त हा नेता