पुणे | 17 ऑक्टोंबर 2023 : पुणे रेल्वे स्थानकावरुन प्रवास करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना नवीन रेल्वे मिळणार आहे. गेल्या दोन, तीन वर्षांपासून बंद पडलेली ही रेल्वे आता पुन्हा सुरु होणार आहे. कोरोना काळात बंद पडलेली सह्याद्री एक्स्प्रेस लवकरच सुरु होण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. पुणे ते कोल्हापूर धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस कोरोना काळात बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता ती पुन्हा सुरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव मध्य रेल्वेकडून रेल्वे बोर्डाला पाठवला आहे. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे २० तारखेला शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहे. मनोज जरांगे पाटील २० आणि २१ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यात येत आहे. यावेळी ते अनेकांच्या गाठीभेटी घेणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत. बारामतीला जाऊन तेथील समन्वयकांची भेट घेणार आहेत. त्याचा दौरा पुणे जिल्ह्यात शिवनेरीपासून सुरु होणार आहे. त्यांच्याकडून शिवनेरी किल्ल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील शिंद गावात नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडमध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गावागावात दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. शिवप्रतिष्ठानकडून दररोज पहाटे दुर्गा दौडचे करण्यात करण्यात येते. यावेळी शिवाजी महाराजांचा जयघोष करत पोवाडा, देशभक्तीपर गीते, दुर्गा देवीची गीते म्हणत अनेक जण सहभागी होतात.
मावळात घोरपडीला जीवनदान देण्यात आले आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने ही कामगिरी केली आहे. येथील निसर्ग वाटिका सोसायटीमध्ये एक मोठी घोरपड आढळून आली. यासंदर्भात माहिती वन्यजीव रक्षक मावळ सर्प मित्रांना मिळली. त्यांनी सोसायटीमध्ये रेस्कू करुन घोरपडची मुक्तता केली. घोरपडीची प्राथमिक तपासणी करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
पुणे जिल्ह्यातील रिंगरोड जमीन संपादन करण्यास खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. आमचा रिंगरोडला विरोध नाही मात्र कष्टाने जपलेली जमीन कवडीमोल किमतीने देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. बागायत किंवा जिरायत असा भेदभाव न करता जमिनीला पाच पट मोबदला देण्याची मागणी त्यांनी केली. रिंग रोडसाठी संपादीत करण्यात येणाऱ्या जमिनी कवडीमोल भाव दिला जात असल्याने खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.