पुणे | 7 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील गुन्हेगारी वाढतच आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी सुरु केलेले प्रयत्न अपूर्ण पडत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील कोयता गँगचा धुमाकूळ पुन्हा सुरु झाला आहे. या कोयता गँगच्या मुसक्या आवरण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रकार केले. मकोकाचा वापर करुन गुन्हेगारांना कारागृहात टाकले. काही जणांना तडीपार केले आहेत. कोम्बिंग ऑपेरशन राबवून गुन्हेगारांचा शोध घेतला गेला. त्यानंतर कोयता गँग सक्रीयच आहे. आता पुन्हा पुण्यात कोयता गँगचा हल्ला झाला आहे. एका गँगने तिघांवर प्राणघातक हल्ला केला आहे. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुलतान शेख हे पुणे शहरातील टिंबर मार्केटजवळ मित्रांशी गप्पा मारत थांबले होते. या वेळी चार मोटार सायकलवर आरोपी आले. त्यांनी रोहित आगलावे याला का मारले? अशी विचारणा करत कोयत्याने हल्ला केला. सुलतान शेख याच्या डोक्यावर कोयताने हल्ला झाला. यामुळे ते गंभीर जखमी झाले. यावेळी सुलतान शेख याचे मित्री अली शेख आणि अकबर यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले. या हल्ला प्रकरणात पोलिसांनी करण आगलावे याच्यासह राहुल शेंडगे, महेश आगलावे, लक्ष्मण जाधव यांना अटक केली आहे. एकूण दहा जणांवर या हल्ला प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
कोयता गँग पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरली आहे. कोयताकडून दहशत निर्माण करण्यासाठी गाड्यांची तोडफोड केली जात असते. भरदिवसा हल्ले कोयता गँगने केले आहे. पुणे पेरुगेट पोलीस चौकीजवळ युवकाने युवतीवर हल्ला केल्याच्या प्रकरणानंतर पोलिसांवर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी काही पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन केले. तसेच पुणे शहरातील पोलीस चौकी २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला.