योगेश बोरसे, पुणे | 27 ऑक्टोंबर 2023 : ललित पाटील येरवडा कारागृहातील कैदी होता. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. 2 ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून तो फरार झाला. त्यानंतर पुणे पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागली. ससून रुग्णालयातील कारभारावर प्रश्न उपस्थित होऊ लागला. यामुळे पुणे पोलिसांनी कारवाई सुरु केली. या प्रकरणाची चौकशी करुन दोषी असणाऱ्या आठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन केले. त्यानंतर आता पुन्हा एका पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई केली. कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. यामुळे या प्रकरणात निलंबन होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 9 झाली आहे.
ड्रग्जमाफिया ललित पाटील पलायन प्रकरणी महिला पोलीस शिपाई सविता हनुमंत भागवत निलंबित केले. पुणे पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. ससून रुग्णालयातील 16 नंबर वार्डात ड्रग्जमाफिया ललित पाटील याला सविता भागवत याने मदत केल्याचा आरोप आहे. सविता भागवत बंदोबस्तासाठी हजर असताना एका संशयित व्यक्तीने काळा रंगाच्या बॅगमधून ललित पाटील याला मोबाईल दिले होते. यामुळे महिला पोलीस सविता भागवत यांच्यावर कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत निलंबन करण्यात आले.
ललित पाटील फरार झाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कठोर कारवाई केली. त्यांनी 2 पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षकांसह 8 जणांचं तडकाफडकी निलंबन केलं होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पुणे क्राईम ब्रँचकडे देण्यात आला होता. यामुळे या प्रकरणात निलंबन झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 9 झाली आहे. पुणे पोलीस आयुक्तांच्या या कारवाईमुळे पोलीस विभागात चांगला वचक निर्माण झाला आहे.
ललित पाटील पळून जाण्याच्या एक दिवस अगोदर एका संशयित इसमाने त्याची भेट घेतली होती. त्यावेळी बंदोबस्तासाठी सविता भागवत होते. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर सविता भागवत यांचा कामातील हलगर्जीपणा समोर आला आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.