पुणे : पुणे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. या जागेवर पोटनिवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. खासदार बापट यांचे निधन होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. दुसरीकडे लोकसभेचा कार्यकाळ आता जवळपास दहा महिने राहिला आहे. त्यामुळे पुणे येथील लोकसभेची निवडणूक होणार की नाही? या प्रश्नाचे उत्तर अजून मिळाले नाही. त्याचवेळी दुसरीकडे विविध पक्षातील इच्छुकांनी मात्र भावी खासदाराचे बॅनरबाजी करुन घेतली होती.
कसबा विधानसभा पोटनिवडणूक काही महिन्यांपूर्वीच झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली होती. कसबा पेठ हा भाजपचा मतदार संघ असताना त्यात भाजप उमेदवार विजयी होऊ शकला नाही. महाविकास आघाडीच्या या विजयानंतर पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु झाली. काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दावा केला. भाजपमधील इच्छुकांनी तयारी केली. या तिन्ही पक्षांमधील नेत्यांनी भावी खासदार म्हणून बॅनर लावली. परंतु ही निवडणूक होणार आहे की नाही? हा प्रश्न आहे. आता राजकीय तज्ज्ञांकडून या निवडणुकीची शक्यता दुरावली असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. यामुळे पुणे लोकसभेचा सामना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत होईल, अशी शक्यता आहे.
लोकसभेचा कार्यकाळ संपण्यास दहा महिन्यांचा कालावधी आहे. निवडणूक जाहीर होणे अन् निवडणूक घेणे या प्रक्रियेसाठी महिनाभर लागू शकतो. यामुळे पुणे लोकसभेच्या नवनिर्विचित खासदारास फक्त सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. यामुळे ही निवडणूक टाळली जाणार की काय? अशी शंका आहे. तसेच कसबा पेठ पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भारतीय जनता पक्षाने सावध पावले उचलली आहे. भाजपकडून लोकसभेच्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरु आहे. त्याचवेळी सामना होईल का? अशी शक्यता आहे.
कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर रोजी निधन झाले होते. त्यानंतर १८ जानेवारी रोजी पोटनिवडणूक जाहीर केली होती. २६ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. अन् दोन मार्चला मतमोजणी झाली होती. परंतु लोकसभा पोटनिवडणूक अद्यापही जाहीर झालेली नाही. त्यामुळे ही निवडणूक होणार की नाही? हीच चर्चा आहे.