अभिजित पोते, पुणे | 5 डिसेंबर 2023 : पाच राज्यातील विधानसभा निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल होती. या निवडणुनंतर आता विविध पक्ष फायनल म्हणजे लोकसभेच्या तयारीला लागले आहे. काँग्रेसकडून आता लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चर्चा सुरु झाली आहे. तेलंगणा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न करणारे काँग्रेस नेते मोहन जोशी यांचे भावी खासदार म्हणून पुण्यात बॅनर्स लागले होते. एकीकडे काँग्रेसमध्ये मोहन जोशी यांच्या नावाची चर्चा सुरु असताना दुसरीकडे आमदार रवींद्र धंगेकर यांनीही लोकसभेची तयारी दर्शवली आहे. मोहन जोशी यांना आमचा पाठिंबा आहे. परंतु पक्षाने आपणास संधी दिली तर आपणही निवडणूक लढण्यास तयार असल्याचे त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले. मी लढवय्या आहे, पक्षाने संधी दिली तर कुठलीही निवडणूक लढण्यासाठी आपण तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ललित पाटील प्रकरणासंदर्भात बोलताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, गेल्या 2 महिन्यांत या प्रकरणासाठी आम्ही अनेक आंदोलने केली. पत्रव्यवहार केला. पोलिसांनी आम्हाला शब्द दिला होता की, कारवाई नक्की करू. त्या अनुषंगाने आता कारवाई सुरू आहे. मात्र, अजून संजीव ठाकूर यांना अटक करून कारवाई झालेली नाही. पोलिसांचा तपास संजीव ठाकूर यांच्यापर्यंत नक्की पोहचणार आहे. त्यांच्यावर कारवाई होईलच पण त्यांना मदत करणारे मंत्री आणि आमदार यांची नावे अजून समोर आली नाहीत, यासंदर्भात देखील चौकशी व्हावी, असे धंगेकर यांनी म्हटले.
हिवाळी अधिवेशनात या सगळ्या प्रकरणावर आपण आवाज उठवणार आहोत. तसे आंदोलनही करणार आहोत. सत्तेत असणाऱ्या मंत्री आणि आमदारांनी ललित पाटील याला पाठबळ दिले. त्याला मदत करणाऱ्या या लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. संजीव ठाकूर याला ज्यांनी फोन केला त्याला अटक झाली पाहिजे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाय रचला. त्यांच्या त्या जागी आता स्मारक होत आहे. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे धन्यवाद म्हटले पाहिजे. भिडे वाड्यावर पुणे महापालिकेने ताबा मिळवला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. देशाला दूरदृष्टी देण्याचे काम या स्मारकातून होईल, ही अपेक्षा आहे, असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.