पुणे | 1 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन मार्गाचे उद्घाटन झाले होते. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग सुरु होऊन आता महिनाभर झाला आहे. या महिन्याभरात पुणेकरांनी मेट्रोला कसा प्रतिसाद दिला? यासंदर्भातील माहिती आली आहे. पुणे मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. अनेक पुणेकरांनी दुचाकी सोडून मेट्रोला पसंती दिली आहे. महिन्याभरात चांगले उत्पन्न मेट्रोला मिळाले आहे.
पुणे मेट्रोतून 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान सरासरी 65 हजार 822 जणांनी प्रवास केला आहे. मेट्रोमधून या महिन्यात 20 लाख 40 हजार 484 जणांनी प्रवास केला आहे. त्यामुळे मेट्रोला 3 कोटी 7 लाख 66 हजार 481 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मेट्रोचे रोजचे सरासरी उत्पन्न 9 लाख 78 हजार 783 रुपये आहे. रविवारी मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक राहिली आहे. रविवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सरासरी 1 लाख आहे. जिल्हा न्यायालयाच्या मार्गावर सर्वाधिक 2 लाख प्रवाशी राहिले आहे तर सर्वात कमी प्रवासी पीसीएमसी मेट्रो स्टेशनवर राहिले आहे. या ठिकाणावरुन फक्त 10 हजार 432 जणांनी प्रवास केला.
मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. मेट्रोतून प्रवास करताना वेळ वाचत आहे तसेच वाहतूक कोंडीत अडकण्याची भीती नाही. यामुळे अनेकांनी आपल्या दुचाकी सोडून मेट्रोनेच प्रवास करणाऱ्यास प्राधान्य दिले आहे. 20 ते 25 हजार प्रवाशांनी स्वत:चे वाहन टाळून मेट्रोने प्रवास सुरु केला असल्याचे दिसून येत आहे. पुणेकर वैयक्तीक ऐवजी सार्वजनिक वाहतुकीच्या दोन्ही सेवांना अधिकाधिक पसंती देत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.
पुणे शहरात सध्या 20 मेट्रो आहेत. त्याची संख्या वाढवून 34 करण्यात येणार आहे. यामुळे पुणे मेट्रोच्या ताफ्यात 14 नवीन मेट्रो येणार आहेत. पिंपरी ते सिव्हल कोर्ट हा रस्ते मार्गाने तासभराचा प्रवास मेट्रोमुळे 20 ते 25 मिनिटांवर आला आहे.