पुणे | 17 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन मार्गाचे उद्घाटन झाले. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग पुणेकरांना मिळाले. पुणेकर या मेट्रोला चांगला प्रतिसाद देत आहे. यामुळे फेज ३ च्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच या प्रकल्पाचा आढावा घेतला होता. त्यावेळी या प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत, असे पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांनी सांगितले.
पुणे मेट्रो रेल्वेच्या दोन मार्गांवर प्रवाशांची गर्दी वाढल्याने आणि मार्गांच्या विस्ताराची मागणी होत आहे. यामुळे पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने (पीएमआरडीए) माणला जोडणाऱ्या 23.2 किमी लांबीच्या मेट्रो लाईन 3 प्रकल्पाच्या विकास कामाला गती दिली आहे. माण ते हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्ग 3 चे काम जोरात सुरु आहे. आतापर्यंत सुमारे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. गणेशखिंड रोडवरील डबल डेकर उड्डाणपुलाच्या विकासाचे कामही पीएमआरडीएने मेट्रो लाइन 3 प्रकल्पातून हाती घेतले आहे.
महामेट्रोच्या रामवाडी ते स्वारगेट या मार्गाचे काम यावर्षा अखेरपर्यंत होणार आहे. बंडगार्डन ते रामवाडी या विभागाचे काम ऑक्टोंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. रामवाडी मार्गावर अनेक महत्वाचे स्थानके आहेत. त्यात बंडगार्डन, येरवाडा, कल्याणीनगर, नगर रोड या स्थानकांचा समावेश आहे. दुसरीकडे सिव्हील कोर्ट ते स्वारगेट स्थानक हा संपूर्ण अंडरग्राऊंड आहे. यामध्ये कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट हे महत्वाचे स्थानक आहेत. सिव्हील कोर्ट ते स्वारगेट हा मार्ग सुरु झाल्यानंतर मेट्रोचा एकूण प्रवास 24km वरुन 33km वर जाणार आहे.
पुणेकर मेट्रो प्रवासाला चांगला प्रतिसाद देत आहेत. यामुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहेत. शनिवार अन् रविवारी ३० टक्के सवलत मेट्रो प्रवाशांना दिली जाते. यामुळे या दोन दिवस चांगलीच गर्दी होत असते.