प्रदीप कापसे, पुणे, दि. 21 नोव्हेंबर | पुणे शहरात आधी सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमपीची सुविधा होती. पुणेकर मोठ्या संख्येने त्याचा वापर करत होते. परंतु वाहतूक कोंडीमुळे प्रवासाला वेळ लागत होता. आता पुणेकरांना पर्याय उपलब्ध झाला आहे. पुणेकरांची मेट्रो दोन मार्गावर सुरु झाली आहे. डिसेंबरपर्यंत तिसऱ्या मार्गावर पुणे मेट्रो सुरु होणार आहे. यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक अधिकच चांगली होणार आहे. पुणेकर मेट्रो आणि पीएमपीएमएलने प्रवास करत असल्याचे सिद्ध झाले आहे. दिवाळी दरम्यान मेट्रो आणि पीएमपीएमएलने उत्पन्नाचे नवीन विक्रम केले आहे. प्रवाशी संख्या वाढली आहे.
दिवाळीत मागील सात दिवसांत पीएमपीच्या तिजोरीत नऊ कोटी सहा लाखांची भर पडली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत उत्पन्नात यंदा तीन कोटींनी वाढ झाली आहे. 2021 मध्ये पीएमपीला दिवाळीत 5 कोटी 34 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर 2022 मध्ये पीएमपीला सहा कोटी 35 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. यामुळे पुणेकर मेट्रोबरोबर पीएमपी बसचा वापर करत असल्याचे दिसून आले. पीएमपीने प्रवाशांना सुविधा देण्यासाठी अनेक बदल केले. पीएमपीच्या ताफ्यात नवीन बसेस दाखल होत आहे.
दिवाळीत पावणे दोन लाख पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला आहे. दिवाळीच्या कालावधीत मेट्रोला 35 लाख 86 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुणेकर रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून प्रवास करण्याऐवजी मेट्रोच्या एसी प्रवासाला पसंती देत आहेत. सुखकर, आरामदायी आणि कमी वेळेत प्रवास होत असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडकर नागरिक मेट्रोची सफर करत आहेत. सध्या पुणे मेट्रोचे दोन मार्ग सुरु आहे. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल या मार्गांवर मेट्रो धावत आहेत. डिसेंबर महिन्यात पुणे मेट्रोच्या विस्तार होण्याची शक्यता आहे. वनाजपर्यंत पुणे मेट्रो धावणार आहे. तसेच शिवाजीनगर ते स्वारगेट या मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. मार्च महिन्यात हा मार्ग सुरु होण्याची शक्यता आहे.