पुणे | 2 ऑक्टोंबर 2023 : पुणे मेट्रोला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवात विक्रमी प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. आता मेट्रोच्या मार्गावर असलेल्या भोसरी मेट्रो स्टेशनच नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी जनतेतून झाली नाही तर महामेट्रोनेच केली आहे. महामेट्रोने पुढे जाऊन केंद्रीय मंत्रालयाकडे पत्र लिहिले आहे. पिंपरी-चिंचवड मुख्यालय ते शिवाजीनगर कोर्ट या मार्गावरील भोसरी स्टेशन आहे. परंतु मेट्रो स्टेशनपासून भोसरी पाच किलोमीटरवर आहे. स्टेशन ज्या ठिकाणी आहे त्या भागाला नाशिक फाटा नावाने ओळखले जाते. भोसरी या ठिकाणाहून पाच किलोमीटर दूर असल्यामुळे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.
सर्वसामान्यांची घर घेताना फसवणूक होऊ नये म्हणून महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण म्हणजे महारेराची स्थापना करण्यात आली. महारेराने केलेल्या नियमांचे उल्लंघन प्रकरणात ७४ विकासकांना नोटीस देण्यात आली. त्यातील 25 प्रकरणांची सुनावणी झाली असून सहा जणांना प्रत्येक दोन लाख रुपयांचा दंड करण्यात आला. गृहप्रकल्पांची जाहिरात देताना क्यूआर कोड प्रसिद्ध केला नसल्याने ही कारवाई झाली. उर्वरित प्रकरणात सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच अन्य 33 विकासकांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी दसऱ्यापासून भूसंपादन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास मिळाले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुरंदर विमानतळासंदर्भात महत्वपूर्ण बैठक झाली. त्यात भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरंदर तालुक्यातील 7 गावांमधील 2 हजार 832 हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. आता समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी 5 हजार कोटी रुपये लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्राची पुनर्रचना करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांच्या नावांमध्ये बदल होणार आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 8 हजार 175 मतदान केंद्र आहेत.
राज्यात डोळ्यांच्या आजाराची साथ ओसरली आहे. आतापर्यंत राज्यातील 5 लाख लोकांना डोळे येवून गेले आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहे. पुणे जिल्ह्यातील 56 हजार जणांचे डोळे आले होते. आता राज्यातील साथ ओसरली असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.