पुणे | 30 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने मेट्रो सुरु झाली. आतापर्यंत पीएमपीएमएलवर पुणेकर अवलंबून होते. परंतु त्यांना आता पुणे मेट्रोचा पर्याय मिळाला. पुणे शहरातील वनाज ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी ते शिवाजीनगर या दोन मार्गांवर मेट्रो सुरु झाली. पुणेकरांनी या मेट्रोला चांगला प्रतिसाद दिला. आता गणेशोत्सव काळात पुणे मेट्रोने नवीन विक्रम केला आहे.
पुणे गणेशोत्सव काळात मेट्रोची सेवा अधिक वेळ सुरु होती. गणेश उत्सव पाहण्यासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दहा दिवस मेट्रोची वेळ वाढवण्यात आली होती. पुणेकरांनी या सेवेचा चांगलाच लाभ घेतला. दहा दिवसांत 9 लाख 61 हजार जणांनी मेट्रोतून प्रवास केला. 22 ते 28 सप्टेंबर दरम्यान मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर प्रवाशांची चांगलीच गर्दी झाली होती. म्हणजेच रोज एक लाख 63 हजार जणांनी मेट्रोतून प्रवास केला.
गणेशोत्सवामुळे सकाळी 6 पासून मेट्रोची सेवा सुरु करण्यात येत होती. मेट्रोची सेवा रात्री 12 पर्यंत तर विसर्जनाच्या दिवशी रात्री 2 वाजपर्यंत सुरु होती. त्यामुळे गणरायाच्या दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या पुणेकारांची चांगलीच सोय झाली. मेट्रोतून 9 लाख 61 हजारांनी प्रवास केल्यामुळे मेट्रोच्या तिजोरीत 1 कोटी 41 लाखांची भर पडली. दहा दिवसांतील उत्पन्नाचा हा विक्रम आहे.
मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची सर्वाधिक संख्या 15 ऑगस्ट रोजी होती. या दिवशी 1 लाख 69 हजार 512 जणांनी मेट्रोतून प्रवास केला होता. त्यावेळी 30 लाख 63 हजार 350 रुपये उत्पन्न झाले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक प्रवासी 28 तारखेला झाले. या दिवशी 1 लाख 63 हजार 227 जणांनी मेट्रोतून प्रवास केला. त्यामुळे एका दिवसाचे उत्पन्न 25 लाख 48 हजार 384 रुपये झाले.
सप्टेंबर महिन्यात 1 ते 28 तारखेपर्यंत 19 लाख 13 हजार 226 जणांनी मेट्रोतून प्रवास केला. त्यामुळे 2 कोटी 81 लाख 89 हजार 760 रुपयांचे उत्पन्न मिळाले. अजून दोन दिवसांची आकडेवारी मिळाल्यावर सप्टेंबर महिन्यातील आकडेवारी वाढणार आहे.