पुणे शहरात मेट्रो सुरु झाल्यानंतर पुणेकरांना दिलासा मिळू लागला आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या पुणेकरांना चांगला पर्याय मिळू लागला आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या दोन मार्गाचे उद्घाटन झाले होते. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग पुणेकरांना मिळाले होते. त्यानंतर या मार्गांचा विस्तार झाला. पुणे मेट्रो पुणेकरांच्या पसंतीला चांगलीच उतरली आहे. त्यामुळेच रविवारी सुटीच्या दिवशीही मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या चांगली असते. आता पुणे मेट्रोने नवीनच विक्रम केला आहे. आतापर्यंतचा सर्वाधिक प्रवासाचा हा विक्रम झाला आहे. एका दिवसांत पावणे दोन लाख प्रवाशांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला आहे.
पुणे मेट्रोतून रविवारी 30 जून रोजी रात्री साडेआठपर्यंत पावणे दोन लाख प्रवाशांनी केला प्रवास केला आहे. आतापर्यंतची ही उच्चांकी प्रवासी संख्या आहे. मागील वर्षी 15 ऑगस्ट रोजी 1.69 लाख प्रवाशांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला होतो. त्या संख्येला आता 30 जून रोजी मागे टाकत नवीन विक्रम झाला आहे. वाढलेल्या प्रवासी संख्येचे श्रेय मेट्रो नेटवर्कच्या अलीकडील विस्ताराला दिले जाऊ शकते. ज्यामुळे दररोज प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. आठवड्याच्या शेवटी 90,000 पेक्षा जास्त आहे.
पुणे शहरात शिवाजीनगर ते स्वारगेट ही भूमिगत मेट्रो सुरु होणार आहे. या प्रकल्पाचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. जुलै अखेरपर्यंत उर्वरित कामे पूर्ण होणार आहे. त्यानंतर शिवाजीनगर कोर्ट ते स्वारगेट मार्गावर मेट्रो धावण्यास सुरुवात होणार आहे. यंदा गणेश उत्सवात या मेट्रोने पुणेकरांना जात येणार आहे. ही मेट्रो सुरु होताच पुणेकरांचा प्रवास अधिक सुखदायी होणार आहे.
सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच मेट्रोचा शिवाजीनगर ते स्वारगेट प्रकल्प सुरु होण्याची शक्यता आहे. या मार्गाची चाचणी काही दिवसांपूर्वी यशस्वी झाली होती. त्यावेळी इतिहासात प्रथमच मुळा-मुठा नदीखालून मेट्रो धावली.