पुणे, | 11 नोव्हेंबर 2023 : लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीचा प्रश्न अर्थात पुणेकरांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे. पण हा प्रश्न गेले दोन वर्ष भिजत पडलाय. मेट्रो सुरु झाली आणि या प्रश्नाची धग आता अधिक जाणवू लागली आहे. पुण्याच्या नागरिकांना मेट्रोतून आल्यानंतर घरापर्यंत पोहचण्यासाठी कार्यक्षम सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था म्हणजे लास्ट माईल कनेक्टिव्हीटी हवी आहे. पण यासाठी लागणाऱ्या 2,000 इलेक्ट्रिक बसेसची योजना गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली आहे. यामुळे पुणेकरांना थेट घरापर्यंत सुविधा मिळत नाही.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल), पुणे महानगरपालिका आणि पिंपरी आणि चिंचवड महापालिका या सर्वाची संयुक्त जबाबादारीने हा प्रकल्प मार्गी लागायला हवा होता. पण प्रकल्पाची अंमलबजावणी न केल्याचे परिणाम दूरगामी होणार आहेत. याचा नव्याने बांधलेल्या मेट्रोवरील प्रवासीसंख्येवर परिणाम झाला आहे. तसेच नागरिकांना अपुर्या सार्वजनिक सोयीसुविधासह प्रवास करावा लागत असल्याने गर्दीचा आणि वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी या महानगरातील नागरिकांच्या फायद्यासाठी फीडर सेवा, बसेस आणि इतर वाहतूक पद्धतींमध्ये सुधारणा करण्याच्या महत्त्वावर भर दिला. वस्तुस्थिती अशी आहे की, PMPML ने तात्काळ जरी या सुविधा मिळवण्यासाठी कार्यवाही सुरु केली आणि या प्रस्तावित 2,000 साठी इलेक्ट्रिक बसेस त्यांच्या ताफ्यात आणण्याचा प्रयत्न केला, तरीही या बसेस कार्यान्वित होण्यासाठी किमान एक वर्ष लागेल.
लास्ट माईल कनेक्टिव्हिटीमध्ये ई-बसचा समावेश करण्याचा निर्णय शहरासाठी महत्त्वपूर्ण वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. मात्र, या विलंबामुळे पुण्यातील वाहतूक पायाभूत सुविधांवर ताणच आला नाही तर त्यामागची आव्हानेही वाढली आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी जबाबदार PMPML च्या नियोजनातल्या त्रुटीमूळे पुणेकरांच्या घरापर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला खो बसला आहे. पर्यायी व्यवस्थेच्या अनुपलब्धतेमुळे पुणे मेट्रोला देखील प्रवासी आणि बरोबरीने महसूल गमवावा लागत आहे. मेट्रोचे प्रवासी मोठ्या प्रमाणावर रिक्शा आणि टॅक्सी तसेच खाजगी वाहने यावर अवलंबून आहेत जे शहराच्या हिताचे नाही.
नियोजनातला ढिसाळपण आणि भविष्याच्या दृष्टिने आवश्यक गरजासाठीचे विचार करण्याचा प्रयत्न होण्याची गरज आहे. यामुळे PMPML वर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या मते “नागरिकांना सामोरे जाव्या लागणाऱ्या गर्दीचा आणि वाहतुकीचा त्रास कमी करण्यासाठी अधिक उत्तम आणि कार्यक्षम शहरी वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलणे अत्यावश्यक आहे.”