पुणे, दि.20 जानेवारी 2024 | पुणे शहरात मेट्रो सुरु झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन केले होते. त्यानंतर पुणेकरांकडून मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु मेट्रो स्थानकावर आल्यानंतर लहान मुलास मोकळे सोडणे एका मातेला चांगलेच भारी पडले. तीन वर्षांचा मुलगा मेट्रोवरील रेल्वे पटरीवर पडला. त्यावेळी मेट्रो जवळ आली. त्याला वाचवण्यासाठी आईने रेल्वे पटरीवर उडी घेतली. परिस्थिती ओळखून सुरक्षा गार्ड विकास बांगर याने मेट्रोला थांबवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर पालकांनी लहान मुलांकडे लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया युजर्सकडून व्यक्त केल्या जात आहेत.
पुणे येथील सिव्हल कोर्ट मेट्रो स्टेशनवर हा प्रकार घडला. एक महिला आपल्या तीन वर्षांच्या मुलासोबत प्रवास करत होती. त्यावेळी तो मुलगा मेट्रो स्थानकावर धावू लागला. तो रेल्वे पटरीच्या दिशेने धावत असल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आले. त्याला पकडण्यासाठी ती धावली. परंतु त्याला पकडण्यापूर्वी तो रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन खाली पकडला. मग त्याला घेण्यासाठी त्या मातेनेही रेल्वे पटरीवर उडी घेतली. त्यावेळी दोन्ही बाजूच्या मेट्रो जवळ आल्या होत्या.
पुणे मेट्रो स्थानकावर तीन वर्षाचा मुलगा रेल्वे पटरीवर पडला, गार्डने…#PuneMetro #punenews pic.twitter.com/xj7wYwtkgI
— jitendra (@jitendrazavar) January 20, 2024
मेट्रो स्टेशनवर गंभीर परिस्थिती निर्माण झाली. लोकांनी त्या मुलाकडे धाव घेतली. त्यावेळी मेट्रो स्टेशनवर सुरक्षा गार्ड म्हणून विकास बांगर उपस्थित होता. त्यांनी युएसपी दाबले. दोन्ही साईडला येणाऱ्या ट्रेन थांबवल्या. त्यानंतर स्टेशन मास्तरांना फोन केला. त्यानंतर आई आणि मुलास सुखरुप वर काढले. त्यामुळे दोघांचे प्राण वाचले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी सुरक्षा गार्डचे कौतूक केले. त्याचवेळी पालकांनी आपल्या लहान मुलांकडे लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या.
पुणे मेट्रो स्थानकावरील व्हायरल झालेल्या या प्रकारामुळे ती आई प्रचंड घाबरली होती. प्रवाशांनी त्या मातेला धिर दिला. दोघांची प्रकृती सुखरुप आहे.