पुणे | 8 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात दोन नवीन मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर मेट्रो सुरु झाली. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल या मार्गांवर मेट्रो धावत आहेत. या मेट्रोला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी आपल्या वैयक्तीक वाहनाऐवजी मेट्रोने प्रवास सुरु केला आहे. नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे ऑगस्ट महिन्यात मेट्रोला 3 कोटी 7 लाख 66 हजार 481 रुपयांचे उत्पन्न मिळाले. परंतु आता मेट्रो संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
पुणे मेट्रोचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ निलेश निकम यांच्या X (पूर्वीचे टि्वटर) अकाउंटवरून व्हायरल झाला आहे. यामध्ये तो रेंज हिल डेपोमध्ये ट्रॅकच्या खाली उभे राहून दोन्ही मेट्रो एकच ट्रॅकवर समोरासमोर आल्याचे सांगत आहे. यामध्ये निलेश निकम मेट्रोचा भोंगळ कारभार असल्याचा दावा करत आहे. तसेच मेट्रो प्रशासनला कळवूनही अधिकारी आले नसल्याचे सांगत आहे.
Pune Metro Denies Claims of Trains Running on Same Tracks pic.twitter.com/xhEy68m3QQ
— jitendra (@jitendrazavar) September 8, 2023
पुणे मेट्रोचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेट्रोकडून तातडीने खुलासा करण्यात आले. मेट्रोचे अधिकारी हेमंत सोनवणे यांनी म्हटले की, मेट्रो हा व्हिडिओ खालून घेतलेला आहे. यामुळे आपणास दोन्ही मेट्रो एकच मार्गावर आल्याचे भासत आहे. परंतु प्रत्यक्षात दोन्ही मेट्रो ट्रेन वेगळ्या मार्गावर आहे. व्हिडिओमध्ये थांबलेली मेट्रो दिसत आहे ती मधल्या मर्गिकेवर आहे. हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यानंतर हे लक्षात येते. तसेच हॉर्न वाजवाऱ्या मेट्रोची चाचणी सुरू आहे. दोन्ही मेट्रो ट्रेन मुख्य मार्गावर नाहीत. त्या डेपो मध्ये ये जा करण्याच्या मार्गावर आहेत. यामधील एक मेट्रो डेपोमध्ये जात आहे, तर दुसरी डेपोमधून मुख्य मार्गावर येत आहे.
पुणे मेट्रो पूर्णपणे सुरक्षित आहे. मेट्रोने प्रवाशांची संपूर्ण काळजी घेतली आहे. मेट्रोच्या दोन ट्रेन एका मार्गावर कधीच येऊ शकत नाहीत. परंतु कधी असे झालेच तर पुणे येथे सुरु झालेल्या मेट्रोमध्ये अद्ययावत यंत्रणा बसवण्यात आली आहे. या तंत्रानुसार दोन्ही ट्रेन स्वतःहून एका विशिष्ठ अंतरावर थांबतील. त्यासाठी कोणत्याही मेट्रो कर्मचाऱ्याची वाट पहावी लागणार नाही.