पुणे शहरातील नागरिकांसाठी महत्वाचा बदल होणार आहे. पुणे मेट्रोचे सुरु असलेल्या कामांमुळे वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. हा बदल १८ मे पासून होणार आहे. पुण्यातील सिमला ऑफिस चौकाजवळ मेट्रो स्टेशनच्या गर्डर लाँचिंग आणि पिलरचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिमला ऑफिस चौक आणि परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त यांनी दिली.
असा असणार बदल
- वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी के. बी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक (एसटी. स्टँड मार्ग) सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग करण्यात येत आहे. तसेच वीर चाफेकर उड्डाणपुलावरून सिमला ऑफिस चौकाकडे जाणारा प्रवेश बंद राहील.
- पर्यायी मार्ग : वीर चाफेकर उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूकडील सेवा रस्त्यावरून चाफेकर चौक डावीकडे वळून न.ता. वाडी – उजवीकडे वळण घेउन सिमला ऑफिस चौकाकडे जाता येईल.
- फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून वीर चाफेकर चौकातून सिमला ऑफिस चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद राहणार आहे.
- पर्यायी मार्ग : चाफेकर चौक – सरळ न.ता. वाडी चौक उजवीकडे वळून सिमला ऑफिस चौक.
- न. ता. वाडी चौक ते वीर चाफेकर चौक प्रवेश बंद राहणार आहे.
- पर्यायी मार्ग : न.ता.वाडी चौकातून डावीकडे वळून सरळ सिमला ऑफिस चौक- उजवीकडे वळून चाफेकर चौक.
- स. गो. बर्वे चौकाकडून सिमला ऑफिस चौकातून शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडे प्रवेश बंद राहील.
- वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी. चौक ते सिमला ऑफिस रस्त्यावर सर्व वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे.
पुणे शहरात मेट्रोचे दोन मार्ग सुरु झाले आहेत. लवकरच पुणे शिवाजीनगर आणि स्वारगेट मार्ग सुरु होणार आहे. भूयारातून असलेल्या मेट्रोच्या या मार्गासाठी नुकतीच चाचणी घेण्यात आली होती. आता लोकसभा निवडणूक निकालानंतर हा मार्ग सुरु होण्याची शक्यता आहे.