पुणे | 5 सप्टेंबर 2023 : पुणे शहर उद्योग आणि माहिती आणि तंत्रज्ञानाची नगरी आहे. पुणे शहरात शिक्षणासाठी देशभरातून विद्यार्थी येतात. यामुळे पुणे शहरातील घरांची मागणी जास्त असते. देशात गेल्या सहा महिन्यात पुणे शहरात सर्वाधिक घरांची विक्री झाली आहे. परंतु अनेकांच्या आवाक्यात ही घरे नसतात. घरांची मागणी जास्त असल्यामुळे घराचे दर वाढलेले असतात. परंतु आता पुणे शहरात कमी किंमतीत घर मिळणार आहे. पाच हजारापेक्षा जास्त घरे म्हाडामार्फत मिळणार आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाने त्यासाठी जाहिरात काढली आहे. ती प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे.
म्हाडाच्या घरासाठी आजपासून प्रक्रिया सुरु झाली. पुणे मंडळातील एकूण 5 हजार 863 घरांसाठी ही प्रक्रिया सुरु केली आहे. मंगळवार ५ सप्टेंबरपासून ऑनलाईन स्वीकृत होणार आहे. हे अर्ज 29 सप्टेंबरपर्यंत सुरु रहाणार आहेत. त्यानंतर 18 ऑक्टोंबरला या घरांसाठी सोडत निघणार आहे. यापूर्वी मार्चमध्ये पुणे मंडळाने सुमारे 6 हजार घरांची सोडत काढली होती. यानंतर आता ही सोडत निघणार आहे.
म्हाडाच्या घरांसाठी चार गटात अर्ज करता येणार आहे. अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च असे गटातून अर्ज करता येणार आहे. मुंबईमधील म्हाडाच्या घरांची नुकतीच लॉटरी काढण्यात आली होती. ही लॉटरी काढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे शहरातही लवकरच म्हाडाची लॉटरी काढण्यात येणार आहे. मुंबईतील लॉटरीत भाजप आमदार नारायण कुचे यांना दक्षिण मुंबईत घर लागले होते. त्यांना हे घर लॉटरीमुळे 7 कोटी 52 लाख 61 हजार 631 रुपयांना मिळाले. त्यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड हे वेटींगवर राहिले.
म्हाडाची घरे राज्य सरकारमार्फत विकली जातात. काही प्रकल्प स्वत: म्हाडाकडून विकसित केले जातात. ते भूखंड त्यांना राज्य सरकारने दिलेले असते. तसेच बांधकाम व्यावसायिकाचे २० टक्के घर विक्री करण्याचे हक्क म्हाडाला मिळतात. त्यामुळे म्हाडाकडून स्वस्तात घरे मिळतात.