पुणे : वाढत्या औद्योगीकरणासोबत पुण्याचा (Pune) विस्तार झपाट्याने होत आहे. पीएमआरडीएचं (PMRDA) विस्तारीत प्रारूप आणि त्यात मेट्रोचं (Pune Metro) आगमन यामुळे रहाण्यासाठी पुण्याला अनेकजण पसंती देत असतात. पुण्यात घरं घेणं हे अनेकांचं स्वप्न आहे. पण शहरीकरणासोबत वाढत चाललेल्या घरांच्या किंमतींमुळे पुण्यात घर घेणं सर्वसामान्यांना शक्य होईलच असं नाही. पण आता पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. पुणे म्हाडाकडून (Pune MHADA) लवकरच एक हजार घरांसाठी लॉटरी (MHADA Lottery Pune) काढली जाणार आहे. ज्यामुळे परवडणाऱ्या दरात पुण्यात घर मिळू शकणार आहे. (Pune MHADA will soon draw lottery for one thousand houses)
पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने एक हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. ही घरं प्रामुख्याने पुणे, पिंपरी चिंचवड शहरातच्या हद्दीतली आहेत. या सदनिका पंतप्रधान आवास योजना, प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य, म्हाडाकडून बांधण्यात आलेले प्रकल्प आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत असणार आहेत.
म्हाडाकडून काढण्यात येणारी ही यावर्षातली तिसरी लॉटरी असणार आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात 5 हजार 217 सदनिकांची लॉटरी काढण्यात आली होती. त्यामध्ये पुणे महापालिका हद्दीतली 410, पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात 1020 आणि कोल्हापूर महापालिका हद्दीतल्या 62 सदनिका होत्या.
त्यानंतर म्हाडाकडून 2 जुलैला दोन हजार 908 घरांची ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढण्यात आली होती. यामध्ये पुण्यासह सोलापूर, सातारा, सांगली, आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या म्हाडाच्या 2153 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतल्या 755 सदनिका होत्या. त्यानंतर आता एक हजार घरं पुन्हा नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
पुणे विभागाच्या म्हाडाकडून यावर्षीच्या तिसऱ्या लॉटरीसाठी गणेशोत्सवाचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. गणेशोत्सावात एक हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच म्हाडाकडून जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे पुण्यात घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
इतर बातम्या :