पुणे : अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी न्यायाधीशांसमोर ढसाढसा रडला

| Updated on: Oct 03, 2024 | 6:50 PM

पुण्याच्या वानवडी परिसरात अल्पवयीन मुलींवर स्कूल व्हॅनमध्ये अत्याचार करणाऱ्या ड्रायव्हरला पोलिसांनी कोर्टात हजर केलं. यावेळी आरोपी कोर्टात ढसाढसा रडला. यावेळी कोर्टाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पुणे : अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी न्यायाधीशांसमोर ढसाढसा रडला
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

बदलापुरात अत्याचाराची घटना ताजी असताना पुण्यातही दोन सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराची संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यात वानवडी परिसरात एका नामांकीत शाळेच्या स्कूल व्हॅनमध्ये त्या व्हॅनच्या चालकानेच चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोपी नराधमाने सलग चार दिवस पीडित मुलींवर अत्याचार केला. पीडित मुलींना त्रास जाणवू लागल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला. 45 वर्षीय आरोपीकडून 6 वर्षीय चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवर 4 दिवसांपासून अत्याचार सुरु होता. आरोपी नराधम हा एका नामांकीत शाळेतील स्कूल बसमध्ये काम करत होता. आरोपी चिमुकलींना पुढे सीटवर बसवत होता. आरोपी बसमध्ये चिमुकलींसोबत अश्लील चाळे करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कुठेही वाच्यता करु नये म्हणून आरोपीकडून चिमुकलींना धमकी दिली जात होती. चिमुकलीला वेदना झाल्यावर आईने विचारपूर केली तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी 45 वर्षीय आरोपी संजय रेड्डी याला अटक केली आहे. त्याला आज पुणे कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी आरोपी कोर्टात न्यायाधीशांसमोर ढसाढसा रडला.

कोर्टात काय-काय घडलं?

यावेळी सुरुवातीला सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. त्यांना त्रास सुरू झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. काल गुन्हा दाखल झाला आणि रात्री आरोपीला अटक केली आहे. आरोपीची वैद्यकीय चाचणी करायची आहे. हा प्रकार आरोपीने कुठे केला, कधी आणि का केला हे जाणून घ्यायचं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

कोर्टाकडून आरोपीला 5 दिवसांची कोठडी

यावेळी आरोपीच्या वकिलांनीदेखील युक्तिवाद केला. आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची असेल तर एक किंवा दोन दिवसांची पोलीस कोठडी पुरेशी होते. आरोपीला डायबिटीस आहे. त्यामुळे कमी कोठडी द्यावी, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली. कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निकाल जाहीर केला. कोर्टाने आरोपी संजय रेड्डी याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आरोपी हा 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत राहील.

वंचितच्या कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅन फोडली

संबंधित घटनेवर आता सर्वच स्तरावरुन संताप व्यक्त केला जातोय. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या घटनेनंतर स्कूल व्हॅनची दगडाने काचे फोडली आहेत. या घटनेवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोक्सो कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाते. कडक कारवाई करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आरोपीवर कडक कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे.