पुणे-मिरज रेल्वे दुहेरीकरण कधी सुरु होणार? चार तासांत होणार प्रवास शक्य

| Updated on: Jul 16, 2023 | 12:40 PM

Pune News : पुणे ते मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. यामुळे काही दिवसांत सहा तासांचा हा प्रवास चार तासांवर येणार आहे. सध्या दोन्ही बाजूने कामे वेगाने सुरु आहे. काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

पुणे-मिरज रेल्वे दुहेरीकरण कधी सुरु होणार? चार तासांत होणार प्रवास शक्य
Follow us on

रणजित जाधव, पुणे | 16 जुलै 2023 : पुणे रेल्वे स्थानकावरुन अनेक शहरांपर्यंत प्रवास करता येतो. आता लवकरच पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर हा प्रवास जलद अन् वेगवान होणार आहे. या मार्गावर असणाऱ्या मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावरील प्रवास अधिक वेगाने होणार आहे. मिरज, पुणे रेल्वेमार्गाचे दुहेरीकरणानंतर सहा तासांचा प्रवास चार तासांवर येणार आहे. परंतु त्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

काय आहे कामाची प्रगती

पुणे मिरज विभागातील 279.05 किलोमीटर पैकी आतापर्यंत 164.07 किलोमीटर दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. नांद्रे ते सांगली स्थानकात दरम्यानचे 12.62 किलोमीटर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येत आहे. उर्वरित काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे एप्रिल २०२४ पासून हा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

काय आहेत अडचणी

पुणे ते मिरज हे अंतर 280 किलोमीटर आहे. या मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामास सहा वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. परंतु सातारा जिल्ह्यात अनेक अवघड वाटा आहेत. हा भाग डोंगराळ आहे. यामुळे बोगदे अन् पुलांची उभारणी करावी लागत आहे. त्या कामांना विलंब होत आहे. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या मार्गावर सांगलीतील कामाला चांगलाच वेग आला आहे.

हे सुद्धा वाचा

नवीन इमारत उभारली

सांगली स्थानकात नवीन स्थानक इमारत बांधली गेली आहे. त्यानंतर या मार्गावर असलेल्या माधवनगर स्थानकावर नवी इमारत तयार केली गेली आहे. माधवनगरला प्लॅटफॉर्म देखील बांधले गेले आहे. नांद्रे रेल्वेस्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा बसवली गेली आहे. पावसाळ्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करत कामे वेगाने सुरु आहे. पुणे मिरज मार्ग सुरु झाल्यानंतर या भागातील अनेक जणांना फायदा होणार आहे. प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. यामुळे एप्रिल २०२४ पासून या मार्गावर सुसाट जात येणार आहे.