पुणे | 21 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष पुन्हा कामाला लागला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड कामाला लागले आहेत. राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जात आहेत. ते पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेऊन पक्षबांधणी करत आहेत. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे देखील पक्ष बांधणीसाठी कामाला लागले आहेत. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षाच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. या दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मनसे नेते वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कामाला सुरुवात करा, अशा सूचना दिल्याची माहिती वसंत मोरे यांनी दिलीय. मुंबईत या दोन्ही नेत्यांची भेट झालीय. वसंत मोरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत आले होते. यावेळी राज ठाकरेंनी मोरेंना कामाला लागण्याची सूचना केली.
विशेष म्हणजे राज ठाकरे उद्या पुण्यात लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. फक्त लोकसभाच नाही तर महापालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरे आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. अमित ठाकरे पनवेल ते राजापूर पदयात्रा काढणार आहेत. या पदयात्रेत पुण्यातील मनसेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे उद्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन लोकसभा निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या वरिष्ठ स्तरावरून सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
दरम्यान, राज ठाकरे उद्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज ठाकरे उद्या पुण्यात दोन विवाह सोहळ्यांना हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरेंचा गेल्या आठवड्यातच पुणे दौरा झाला होता. त्यानंतर ते उद्या पुन्हा पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. राज ठाकरे उद्या खाजगी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर ते उद्या दुपारनंतर पुण्यात येतील. या दरम्यान ते पक्षातील पदाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.