पिंपरी चिंचवड : साई सुधीर कवडे (Sai Sudhir Kawade) या बाल गिर्यारोहकाने एव्हरेस्ट बेस कँपवर तिरंगा फडकवला आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असलेला भगवा त्याने एव्हरेस्टवर (Everest) फडकावत एक विक्रमच केला आहे. देश आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची वाटचाल करीत असताना तेरा वर्षीय बालगिर्यारोहक साई कवडे याने जगातील सर्वोच्च अशा एव्हरेस्ट शिखराच्या बेस कँपवर ज्याची उंची जवळपास 5,464 मीटर एवढी आहे, अशा ठिकाणी तिरंगा फडकावत राज्याची आणि देशाची मान उंचावली आहे. काल (27 मे) राष्ट्रगीत म्हणत 175 फुटी भारताचा राष्ट्रध्वज त्याने फडकवला आहे. त्यामुळे अनेक भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. बालगिर्यारोहक (Child climber) साईने या आधीही बालवयातच देश विदेशांतील अनेक शिखरे लीलया पादाक्रांत केलेली आहेत. त्यासाठी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसारख्या अनेक पुस्तकांत त्याच्या पराक्रमाची नोंददेखील झालेली आहे.
2009मध्ये जन्मलेल्या साईने वयाच्या चौथ्या वर्षी ट्रेकिंगचा एक साहसी प्रवास सुरू केला. त्याने महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांपासून सुरुवात केली आणि वयाच्या 9व्या वर्षीपासून विविध अशा 100हून अधिक पर्वतराजींचा ट्रेक केला. लेह लडाखचे स्टोक कांगरी पर्वत, जपानचे माउंट किलीमांजारो, रशियाचे माउंट एल्ब्रस, पाटलसू शिखर अशा काही पर्वतशिखरांचा समावेश आहे, जिथे त्याने तिरंगा फडकवला. साईने 15 ऑगस्ट 2018रोजी रशियाच्या माऊंट एल्ब्रसच्या शिखरावर पाऊल टाकून विश्वविक्रम केला आणि वयाच्या 10व्या वर्षी असे करणारा आशियातील तो सर्वात तरूण मुलगा ठरला. या पराक्रमाची नोंद कोणीही केलेली नाही.
कोविडच्या आव्हानात्मक काळातही, साईने दोन शिखरांवर यशस्वी चढाई केली, एक भारताच्या हिमाचल प्रदेशात वसलेले पातालसू शिखर आणि दुसरे जम्मू आणि काश्मीरमधील मैत्री शिखर. साई जो तिसरे शिखर चढणार होता, ते शिटीधर पर्वत. मात्र, अचानक दगड कोसळण्याच्या घटनेमुळे मोहीम रद्द करावी लागली. या शिखरांचा प्रवास पुणे ते मनालीमार्गे दिल्ली असा सुरू झाला होता. दरम्यान, साईची एक ठरलेली जीवनशैली आहे, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तो रोज 4-5 तास व्यायाम करतो. सई आरोग्यदायी आहार घेतो, ज्यामध्ये ड्रायफ्रुट्स, फळे, हेल्दी ड्रिंक्स, उकडलेले अंडी, कडधान्ये इत्यादींचा समावेश आहे. त्याच्या या यशामुळे आई-वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे.