पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (MPSC) भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आयोगाच्या कारभाराविरोधात विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने आंदोलन करत आहेत. एमपीएससी मंडळाच्या ढिसाळ कारभाराचा फटका अनेक वर्षांपासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वारंवार बसत आहे. यामुळे शरद पवार यांच्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागले. आता एमपीएससीच्या पीएसआय भरतीमध्ये आयोगाचा पुन्हा घोळ उघड झाला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) पीएसआय पदाचा महिला भरतीसाठीचा क्रायटेरिया बदलला आहे. त्याचा फटका अनेक विद्यार्थींनींना बसणार आहे. महिला भरती करण्यासाठी मैदानी परीक्षेसाठी आयोगाने नवे नियम तयार केले आहे. मैदानी परीक्षेसाठी असणारा क्रायटेरिया आयोगाकडून बदलला गेला आहे. 2020 ला वेगळे नियम तर 2021 भरतीसाठी आयोगाने नवीन नियम तयार केले आहे. “लांब उडी” संदर्भात बदललेल्या नियमावरुन विद्यार्थीनी आक्रमक झाल्या आहेत. मैदानी परीक्षेचा क्रायटेरिया आयोगाने बदलू नये, अशी मागणी परीक्षार्थी विद्यार्थिनींनी आयोगाकडे केली आहे.
काय झाला बदल
वॉकिंग, रानिंग आणि गोळा फेक या तीन मैदानी परीक्षा याआधी आयोगाकडून घेतल्या जात होत्या. आता या नियमांमध्ये बदल करून रनिंग, लांब उडी आणि गोळा फेक करण्यात आले आहे. लांब उडीसंदर्भातील बदलास महिला परीक्षार्थींनी विरोध केला आहे. हा बदल त्यांना अवघड जाणार आहे. आयोगाने नियम बदलू नये, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे.
यापूर्वी झाले आंदोलन
एमपीएससी विद्यार्थ्यांनी यापूर्वी आंदोलन केले होते. त्यांनी एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा, या मागणीसाठी आंदोलन केले होते. आंदोलनानंतर ही मागणी मान्य झाली.
एमपीएससीचा अभ्यासक्रम २०२३ पासून अचानक बदलण्यात आला. युपीएससी परीक्षेसारखा हा अभ्यासक्रम केला गेला. विद्यार्थी अनेक वर्षांपासून जुन्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करत आहेत. परंतु अभ्यासक्रम बदल्यामुळे त्यांची गेल्या काही वर्षांपासूनची मेहनत वाया जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करण्यासाठी कमी वेळ मिळाला आहे. त्यामुळे पुढच्या दोन वर्षांनी अभ्यासक्रम बदलण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती.