पुणे : पुणे येथील एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण अन् वनअधिकारी झालेली दर्शना पवार हिचा खून झाला. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी १८ जून रोजी तिचा मृतदेह मिळाला होता. डॉक्टरांकडून तिच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला. त्यानंतर तिची हत्याच झाल्याचे स्पष्ट झाले. मग या हत्या प्रकरणात राहुल दत्तात्रय हांडोरे याचे नाव समोर आले. तो फरार होता. त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. अखेर तो मुंबईतील अंधेरीत सापडला अन् त्याला अटक झाली. परंतु हा राहुल हंडोरे आहे तरी कोण?
दर्शना पवार आणि राहुल हंडोरे यांची ओळख कशी झाली, हे पुणे पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. ते लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. कारण मुळची कोपरगावची असलेल्या दर्शना हिच सिन्नर तालुक्यात आजोळ आहे. सिन्नर तालुक्यातील राहुल हंडोरे आहे. दर्शनाच्या मामांचे घर अन् राहुलचे घर शेजारी शेजारी आहे. यामुळे दोघांची आधीपासून ओळख होती. यामुळे दर्शना आणि राहुल पुणे शहरात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आले. राहुल यानेही एमपीएससीची परीक्षा दिली. त्याला अपयश आले, मात्र दर्शना पहिल्याच प्रयत्नात वनअधिकारी झाली.
एमपीएससी परीक्षेची तयारी राहुल हांडोरे 4 ते 5 वर्षांपासून करत होता. त्यासाठी तो पुण्यात आला अन् कर्वेनगरमध्ये राहू लागला. या ठिकाणी कर्वेनगरमधील भाड्याच्या खोलीत तो भावासोबत राहत होता. राहुल याने विज्ञान विषयाची पदवी घेतली होती. स्वत:चा खर्च चालवण्यासाठी अनेकवेळा डिलीवरी बॉय म्हणून राहुल काम करत होता. कधी कुठे पार्टटाईम जॉब करत होता.
राहुल हंडोरे हा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो सिन्नर तालुक्यातील शाहवाडी या ठिकाणी राहत होता. त्याच्या घरची परिस्थिती साधारण आहे. वडील घरोघरी जाऊन पेपर टाकतात तर भाऊ हातावर रोजगार मिळवून आपली उपजिविका सांभाळत होता. मग राहुल पुण्याला आल्यानंतर तो ही पुण्याला आला.