पुणे | 18 ऑगस्ट 2023 : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वारंवार अपघात होत असतात. हे अपघात टाळण्यासाठी मोठी योजना हाती घेतली आहे. महामार्गावरील अनेक अपघात वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे होतात. तसेच यामुळेच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या सर्व प्रकारावर मार्ग काढण्यासाठी सुमारे १६० कोटी रुपये खर्च करुन इंटेलिजन्स ट्रॅफीक मॅनेजमेंट प्रणाली (ITMS) उभारण्यात येत आहे. या प्रणालीमुळे अपघात टळणार आहे अन् लाख मोलांचे जीव वाचणार आहे. तसेच बेशिस्त वाहनधारकांना नियम मोडणे चांगलेच महागात पडणार आहे.
पुणे, मुंबई एक्स्प्रेसवर इंटेलिजन्स ट्रॅफीक मॅनेजमेंट प्रणाली बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या ऑक्टोंबर महिन्यापासून ही प्रणाली कार्यन्वीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र स्टेट रोड ट्रन्सपोर्ट कॉरपोरेशन (MSRDC) कडून ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. महामार्गावर 430 कॅमेरे असणार आहे. हे कॅमेरे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहे.
महामार्गावर बसवण्यात येणारे कॅमेरे सुमारे 17 प्रकारचे वाहतुकीचे उल्लंघन शोधू शकतात. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) मॉडेल अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. त्यासाठी कुसगाव येथे एक कमांड अँड कंट्रोल सेंटर (CCC) देखील तयार केले गेले आहे. या ठिकाणी बसून महामार्ग पोलीस अधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सहभागाने चोवीस तास लक्ष ठेवणार आहे.
मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक वाहनांवर लक्ष ठेवणार आहे. महामार्गावर एखादे वाहन वेग मर्यादा ओलांडल्यास ‘अॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम’ने तपासणी होईल. ‘लेन डिसिप्लीन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम’मधून लेन मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
डावीकडून जाणारी पहिली लेन अवजड वाहनांसाठी आहे. त्यांना ८० किलोमीटरची वेग मर्यादा असणार आहे.दुसरी लेन चारचाकी वाहनांची असणार आहे. त्याची वेगमर्यादा १०० किलोमीटर असणार आहे. तर तिसरी लेन ओव्हरटेकची आहे. या लेनमधून ओव्हरटेक करुन पुन्हा आपल्या निर्धारित लेनमधूनच प्रवास करायचा आहे. हे नियम मोडल्यास कारवाई अटळ असणार आहे.