पुणे | 28 जुलै 2023 : पुण्याहून मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक अखेर सुरु झालीय. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या 3 तासांपासून विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉक दरम्यान घाटातील दरड हटवण्याचं काम सुरु होतं. अखेर 3 तास 20 मिनिटांनी वाहतूक सोडण्यात आली आहे. दोन लेन सुरु करण्यात आल्या आहेत. तिसरी लेन बंद ठेवण्यात आली आहे. दरड किंवा दगड, मातीचा ढिगारा कोसळला तर त्याल लेनवर पडतील. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तिसरी लेन बंद करण्यात आली आहे.
कामशेत बोगद्याजवळ दुपारी 2 वाजेपासून ब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर तीन तास वीस मिनिटांनी ब्लॉक मागे घेण्यात आला आणि वाहनांसाठी मार्ग मोकळा करण्यात आला. कामशेत बोगद्याजवळ काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास दरड कोसळली होती. त्यावेळी प्रशासमाकडून एक लेन सुरु ठेवण्यात आली होती. प्रशासनाकडून रात्रीपासून काम सुरु होतं. अखेर आज संध्याकाळी सव्वा पाच वाजता आज वाहतुकीसाठी दोन लेन सुरु करण्यात आले आहेत.
या तीन तासांच्या ब्लॉक दरम्यान प्रशासनाकडून महत्त्वाचं काम करण्यात आलं आहे. पावसामुळे सैल झालेले दगड काढण्यात आले. तसेच दरड हटवण्याचं देखील काम झालं. याशिवाय पुन्हा तशी घटना घडल्यास कोणतंही नुकसान होऊ नये यासाठी एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. तर दोन लेन या वाहतुकीसाठी सुरु आहेत. दरम्यान, ब्लॉक काळात वाहतूक जुन्या पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेच्या मार्गाने वळवण्यात आली.
राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई आणि पुणे जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडतोय. घाट परिसरात हवामान विभागाकडून आधीपासूनच रेड अलर्ट जारी करण्यात येतोय. घाट परिसरात प्रचंड पाऊस पडतोय. त्याचा परिणाम वाहतुकीवर पडतोय. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 23 जुलैला रविवारी पहिली दरड कोसळण्याची घटना घडली होती. आडोसी बोगद्याजवळ ही घटना घडली होती. त्यानंतर त्याच रात्री लोणावळ्याजवळ मध्यरात्री तीन वाजता दरड कोसळली होती. लोणावळ्यामध्ये प्रचंडल पाऊस पडतोय. त्यामुळे ही दरड कोसळली होती. त्यानंतर काल रात्री नऊ वाजता कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली. दरडी हटवण्यासाठी सातत्याने विशेष ब्लॉक घेण्यात आले आहेत आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.