पुणे : पुण्यात वाहतूक कोंडी (Pune Traffic Issue) ही एक गंभीर समस्या बनली आहे. पुण्यात जिथे जाल तिथे तुम्हाला वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागतं. पुण्याप्रमाणे पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर (Pune-Mumbai Expressway) वाहतूक कोंडी होत असते. शनिवारी सकाळी पुन्हा मुंबईच्या बाजूला वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोडींमुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. त्यामुळे मोठा टोल भरुन एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्या लोकांचा वेळ वाया जात आहे.
कुठे झाली वाहतुकीची कोंडी
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबईच्या बाजूला शनिवारी सकाळी ९.३० वाजता वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. या रांगा दोन किलोमीटरपर्यंत लागल्या. ही वाहतूक कोंडी कशामुळे झाली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. परंतु महामार्गावर नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मनस्ताप होत आहे.
Jam on Mumbi-Pune Expressway towards Mumbai side at 9:30 am#Pune #Mumbai pic.twitter.com/1i7Gt6hm8T
— jitendra (@jitendrazavar) May 20, 2023
टोल वाढला पण…
या महामार्गावर टोल वाढवण्यात आला आहे. परंतु वाहतूक कोंडीतून कायमस्वरुपी तोडगा काढण्यात आला नाही. दर आठवड्याला शनिवारी आणि रविवारी वाहतूक कोंडी होत असते. साप्ताहिक सुट्यांमुळे पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे ही कोंडी होते. यामुळे शनिवारी अन् रविवारी एक्स्प्रेस वे फक्त नावालाच एक्स्प्रेस असतो.
देशात सर्वाधिक टोल
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 2004 ला हा टोल सुरू करताना दर तीन वर्षांनी 18% दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार टोलच्या दरात 18 टक्के वाढ 1 एप्रिल 2023 पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावरुन जाताना आता वाढीव टोल देऊन प्रवास करावा लागणार आहे. परंतु ही दरवाढ देशात सर्वाधिक आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रतिकिलोमोटीर 1.73 रुपये टोल कारसाठी आकारला जातो. तो मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर तब्बल 3.40 रुपये प्रतिकिलोमीटर आहे. इतका टोल देशात कुठेही नाही.
अपघात अन् वाहतूक कोंडी
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात मागील आठवड्यात अपघात झाला होता. या मार्गावर बोरघाट उतरत असताना ब्रेकफेल झाल्यानं चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक तिसऱ्या लेनवर पलटला. त्यापूर्वी 27 एप्रिलला ट्रकचा असाच ब्रेकफेल झाल्यानेच विचित्र अपघात झाला होता. मुंबई-पुणे महामार्गावर अनेक अपघाताच्या घटनाही घडतात. त्यापूर्वी एकूण अकरा वाहनं एकमेकांना धडकली होती. या अपघातानंतर एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला होता.