पुणे | 18 जुलै 2023 : रेल्वे विभागाकडून अनेक वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. देशातील अनेक रेल्वे स्थानकांचे आधुनिकरण केले जात आहे. प्रवाशांसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या जात आहेत. नवीन रेल्वे सुरु केल्या जात आहेत. तसेच रेल्वे आपल्या पायाभूत सुविधाही अधिक चांगल्या करत आहे. आता भारतीय रेल्वेने आपली स्थानके सौर उर्जाने प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पुणे, मुंबई, भुसावळ अन् नागपूर स्थानकाचा समावेश आहे.
मध्य रेल्वेने 4.105 MW वीज निर्मितीसाठी प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकांवर रुफटॉप म्हणजेच सौर पॅनल बसवून वीज निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी पुणे, भुसावळ, नागपूर आणि मुंबई या ठिकाणी पब्लिक प्राईव्हेट पार्टनशिपमध्ये प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर या ठिकाणी सौर उर्जाने स्थानके उजळणार आहे.
सौर उर्जा प्रकल्प दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या प्रकल्पात 10 kW ते 100 kW पर्यंत वीजनिर्मिती केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 100 kW ते 500 kW पर्यंत वीजनिर्मिती केली जाणार आहे. या माध्यमातून 4.105 MW वीज निर्मिती चार स्थानकावर होणार आहे. त्यात पुणे, मुंबई, नागपूर आणि भुसावळ स्थानकाचा समावेश आहे.
रेल्वेने सौर उर्जा प्रकल्प निर्मितीसाठी निविदा मागवल्या आहेत. 28 ऑगस्ट 2023 पर्यंत यासाठी निविदा भरता येणार आहे. हा प्रकल्प 240 दिवसांत पूर्ण करावा लागणार आहे. तसेच विकासकांना 25 वर्षांपर्यंत या प्रकल्पाचे मेंटनन्स करावे लागणार आहे.
भारतात पहिले सौर उर्जेवरील स्थानक चेन्नईत सुरु झाले. या ठिकाणी असलेले पुराची थलाईवा डॉ. एम. जी. रामचंद्रन सेंट्रल स्थानक शंभर टक्के सौर उर्जेवर चालते. या रेल्वे स्थानकास चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक म्हणूनही ओळखले जाते. या रेल्वे स्थानकावर सौर पॅनेल्स बसवून उर्जा निर्मिती केली जाते. या ठिकाणी १.५ मेगा वॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवले गेले आहे. यामुळे या स्थानकावरील विजेची गरज पूर्णपणे भागवली जाते.