पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे असलेल्या दरीत खासगी बस मागील आठवड्यात कोसळली होती. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारी पहाटे झालेल्या या भीषण अपघातानंतर शासन-प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आता या महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी मोठी योजना हाती घेतली आहे. सुमारे १६० कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे अपघात टळणार आहे अन् लाख मोलांचे जीव वाचणार आहे. या महामार्गावर नियम तोडणे चालकांना चांगलेच महागात पडणार आहे, कारण त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञान असणार आहे.
आयटीएमएस यंत्रणा
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आयटीएमएस म्हणजेच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसविण्यात येणार आहे. आता परिवहन विभाग, महामार्ग पोलिस व ‘एमएसआरडीसी’ने त्यासाठी हालचाली सुरु केल्याय. यासाठी लवकरच सर्व्हेला सुरुवात होणार आहे.
काय आहे तंत्रज्ञान
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर आता वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. वाहनांनी ठरवून दिलेली मार्गिका सोडू नये यासाठी ‘आयटीएमएस’ काम करणार आहे. वाहतुकीची शिस्त पाळणे, अपघात टळाणे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविणार
काय झाले होते
शनिवारी १५ एप्रिल रोजी एक खासगी बस पुण्याहून मुंबईकडे निघाली होती. पहाटे चारच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. चालकाचा ताबा सुटल्याने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील शिंगरोबा मंदिराच्या मागील घाटात बसचा तोल गेला. त्यानंतर ही बस दरीत कोसळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता प्रशासनाने या मार्गावर अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे.