रणजित जाधव, पुणे | 1 ऑक्टोंबर 2023 : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग सलग सुट्या आल्या की कासव गतीने चालणार मार्ग होतो. या एक्स्प्रेस वे ची क्षमता दिवसाला ६० हजार वाहनांची असताना सुट्यांच्या दिवशी ८० हजार ते एक लाख वाहने महामार्गावर येतात. यामुळे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार अनेकवेळा घडतात. या महामार्गावर जुन्या मार्गापेक्षा टोल अधिक आहे. यामुळे अनेक जण जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने जातात. रविवारी या महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांना काही काळ सुखद धक्का बसला. विना टोल वाहने जाऊ लागली.
जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सोमटने टोल नाका आहे. या नाक्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यासंदर्भातील माहिती सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना मिळाली. त्यांनी सरळ सोमटने टोल नाका गाठला. त्यानंतर सर्व वाहने विनाटोल सोडायला भाग पाडले. टोल आकारायला घेतला जाणारा वेळेमुळे वाहतूक ठप्प होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी टोल नाक्यांवर तासनतास लागणाऱ्या वाहनांच्या रांगासंदर्भात घोषणा केली होती. टोल नाक्यावर लागणाऱ्या लांब रांगा बंद करण्यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) नुसार टोल घेण्याचे सांगितले होते. परंतु त्याची अजून अंमलबजावणी झाली नाही. आता सोमटने टोल नाक्यावर रविवारी पुन्हा रांगा लागल्या. आमदार सुनील शेळके असेपर्यंत या ठिकाणी विना टोल वाहने सोडण्यात आली. त्यांनी बरीच वाहने विनाटोल सोडली. परंतु आमदार शेळके निघून गेल्यावर पुन्हा टोल वसुली सुरू झाली.
सोमटने टोल नाका बंद करण्यासाठी यापूर्वी अनेक वेळा आंदोलने झाली. सोमाटने टोल नाका हटाव समितीने हा प्रश्न उचलला होता. त्यानंतर एमएच १२ क्रमांकाच्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली होती. परंतु पुन्हा या वाहनांकडून टोल आकारले जात आहे. तसेच या टोल विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.