पुणे | 19 ऑक्टोंबर 2023 : यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी झाला. त्याचा परिणाम आता होणार आहे. पुणे शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जलसाठा पुरेसा आहे. परंतु भविष्यातील नियोजनामुळे पुणे मनपास मागणीनुसार पाणी मंजूर झालेले नाही. यामुळे पुणे महापालिकेला पाण्याचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी केली आहे. जलसंपदा विभागाने २०२३ -२४ या वर्षासाठी २० टीएमसी पाणी द्यावे. पुणे मनपास मंजूर झालेले १२.१८ टीएमसी पाणी अपूर्ण आहे. कारण ३४ गावांचा समावेश पुणे मनपात झाला आहे. यामुळे पुणे शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे, अशी मागणी पुणे मनपाकडून करण्यात आली आहे. पुणे मनपा आयुक्त पत्र विक्रमकुमार यांनी त्यासाठी जलसंधारण विभागाला पत्र पाठवले आहे.
पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (NDA) प्रशिक्षण घेणारा महाराष्ट्रातील कॅडेटचा मृत्यू झाला आहे. प्रथम महाले असे त्याचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर कमांड रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
PMPL ने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. PMPL कडून गेल्या 15 दिवसांत 619 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाकडून या प्रवाशांना 4 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. पीएमपीएलकडून शहरभरात तिकीट तपासणी करणारी भरारी पथके वाढवली आहे. तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांवर 500 रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यात टँकरची संख्या घटली आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक गावे टँकर मुक्त झाली आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात मात्र अजूनही टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पुणे जिल्ह्यात अजून 114 टँकर सुरू आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने जिल्ह्यातील अनेक गावांना दिलासा मिळाला आहे. यामुळे अनेक गावांत टँकरने होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यात टँकरची संख्या 200 पर्यंत गेली होती.
पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. दुकान फोडत 5 लाख 25 हजार रुपये लुटले गेले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत पोलिसांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहे. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत भर दिवसा दुकान फोडले गेले होते. या प्रकरणी आकाश उर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने या आधी देखील पुण्यात अनेक ठिकाणी चोरी केली आहे.