पुणे | 1 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. पुणे शहर महानगरपालिका त्यांना शिष्यवृत्ती देणार आहे. मनपाने या शिष्यवृत्तीची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. आता त्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मनपाने विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. मनपाने या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शिष्यवृत्ती योजनेसाठी १५ कोटींपेक्षा जास्त रक्कमेची तरतूद केली होती.
पुणे महापालिका शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज स्विकारणार आहे. ऑनलाइन अर्ज येत्या ९ ऑक्टोंबरपासून स्वीकारण्यात येणार आहेत. दरवर्षी या योजनेतून जवळपास १० ते १२ हजार विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती दिली जाते. दहावी आणि बारावीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिले जाते. मनपाकडे शिष्यवृत्तीसाठी आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जाणार आहे. या प्रक्रियेसाठी किमान तीन ते चार महिने लागण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या दहावीचे विद्यार्थी मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाह्य योजनेनुसार पात्र ठरतात. त्यांना १५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजना आहे. या योजनेतून बारावीच्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये शैक्षणिक अर्थसाह्य म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते.
यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा प्रयत्न मनपाकडून करण्यात येणार आहे. मार्च महिन्यापर्यंत शिष्यवृत्तीचे पैसे जमा न झाल्यास विद्यार्थ्यांना जून महिन्यापर्यंत वाट पाहण्याची शक्यता आहे. योजनेची माहिती देताना मनपाच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास म्हणाले की, शिष्यवृत्ती योजनेसाठी ९ ऑक्टोबरपासून अर्ज स्वीकारले जाणार आहे. अर्ज भरण्याची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत आहे.