पुणे : राज्यभरात शाळा सुरु झाल्या आहेत. सर्वच ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटमुळे शाळा गजबजल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुटीनंतर शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असतो. त्यांना आपले वर्गशिक्षक कोण? कोणते नवीन मित्र मिळणार? कोणत्या विषयाला कोणते शिक्षक आहेत? या सर्वांबद्दल उत्सुक्ता असते. परंतु शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी हजर अन् शिक्षकच नसले तर…हा प्रकार पुणे शहरात घडला आहे. पुणे महानगरपालिकांच्या शाळांमधील हा प्रकार आहे.
पुणे महानगरापालिकेच्या इंग्रजी शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती केली गेली नाही. मनपाच्या शाळांमध्ये पूर्णवेळ शिक्षक आणि मुख्याध्यापकांची नियुक्ती केलेली नाही. शिक्षण विभागाने 50 हून अधिक माजी कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती केली नाही तसेच त्यांचे मे महिन्याचे मानधन प्रत्येकी 15,000 रुपये मानधन दिलेले नाही. अजूनही 50 हून अधिक शिक्षक मे महिन्याच्या मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. पीएमसीची तिजोरी भरलेली असताना शिक्षकांना त्यांचे मानधन दिले गेले नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
शिक्षकांनी पीएमसीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील रिक्त जागा भरण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या कराराचे नूतनीकरण करावे, पूर्णवेळ मुख्याध्यापकांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. मनपाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर परिणाम होतो. खाजगी शाळांमधील भरमसाठ शुल्क अनेक पालकांना पेलवत नाही. त्यामुळे ते सरकारी शाळांमध्ये मुलांना दाखल करतात. त्याचा परिणाम खासगी शाळांवर होतो. त्यामुळे सरकारी शाळा पूर्णपणे बंद करण्यासाठी पीएमसी अधिकारी आणि खाजगी शाळा मालक यांच्यात छुपा संगनमत असल्याचा आरोप काही शिक्षक करत आहेत.
पीएमसीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये गेल्या १२ वर्षांपासून पूर्णवेळ पदवीधर मुख्याध्यापक नाहीत. महापालिका शाळांमध्ये शिक्षकांची सुमारे ३०० पदे रिक्त आहेत. पीएमसीच्या शिक्षण प्रशासन अधिकारी मिनाक्षी राऊत यांनी सांगितले की, “सध्या पीएमसी शाळांसाठी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही दिवसांत शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध होतील. मुख्याध्यापकांच्या नियुक्तीचीही प्रक्रिया सुरू आहे.