पुणे : ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुणे मुक्कामी आहे. पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम आहे. माऊलींच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच वारकऱ्यांनी आणि पुणेकरांनी गर्दी केली आहे. साधारण 3 ते 4 किलोमीटर रांगा लागल्या आहेत. तासान तास रांगेत उभे राहूनही वारकऱ्यांचा उत्साह मात्र कमी होत नाहीय. वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक संघटना पुढे आल्या आहेत. परंतु फय्याज मोमीन आणि असिफ अली मोहम्मद सय्यद या दोघांच्या सेवेने वारकरी भरावले आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन या दोन्ही युवकांकडून होत आहे.
फय्याज मोमीन आणि असिफ अली मोहम्मद सय्यद हे दोन्ही रिक्षाचालक आहे. 11 जून रोजी आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले. त्या मार्गात पुण्यात ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात मुक्कामास आहेत. लाखो वारकरी वारीसोबत पुण्यात दाखल झाले आहेत. यात वृद्ध, अपंग वारकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अशा वारकऱ्यांना पुण्यातील मुस्लिम रिक्षाचालकांनी मोफत सेवा पुरवली आहे. आळंदीपासून पालखी मुक्काम स्थळापर्यंत या रिक्षाचालकांनी वारकऱ्यांना मोफत सेवा दिली आहे.
राज्यातील हिंदू मुस्लिम सगळे जण धर्मा सोबतच असल्याचा संदेश पुण्यातील काही रिक्षाचालकांनी यंदाच्या वारीतून दिला आहे. वारकरी या युवकांच्या सेवेने भारवले. त्यांचे आभार मानत आम्हाला यांच्यांमध्ये विठ्ठलच दिसतो, असे पंढरीच्या वाटेतील वारेकऱ्यांनी म्हटलंय.
वारी म्हणजे सर्वधर्म समभावचे एक उदाहरण आहे. वारीमध्ये सर्वधर्मसमभावाची लोक एकत्र येऊन वारी करत असतात. पुण्याची साखळी पीर तालीम राष्ट्रीय मंदिराच्या वतीने सर्वधर्म दिंडी काढण्यात आली. यामध्ये हिंदू-मुस्लिम, शीख यासह इतर धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन दिंडी काढली.या दिंडीत सर्वच धर्मातील लोक सहभागी झाले होते.
पंढरपुरात जोरदार तयारी
विठुरायाच्या दर्शनाचा ओढीने लाखो वारकरी भक्त पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. अशातच पंढरपुरात विठ्ठल भेटीसाठी असणाऱ्या मंदिरातील दर्शन रांगेत बारा पत्रा शेड उभा करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. साधारणपणे 12 हजार भाविक उभा राहतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या पत्रासेडमध्ये भाविकांना 24 तास चहा, पाणी नाश्ता जेवण देण्यात येणार आहे. तसेच विठ्ठलाचे स्क्रीनवरती ऑनलाईन दर्शन सुविधा असणार आहे.