सुनिल थिगळे, पुणे | 7 ऑगस्ट 2023 : देशातील शेतकऱ्यांसमोर नेहमी संकटे असतात. कधी अतिवृष्टीचे संकट शेतकऱ्यांना असते तर कधी दुष्काळ येतो. त्यातून बाहेर पडल्यावर शेतमालास दर मिळत नाही. कांदा आणि टोमॅटोची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना वारंवार या प्रश्नांना समोरे जावे लागते. अनेक वेळा दर मिळत नसल्यामुळे हे पीक रस्त्यावर फेकून द्यावे लागते किंवा गुरांना शेतात सोडून द्यावे लागते. परंतु यंदा कधी नव्हे असा दर टोमॅटोला मिळाला. यामुळे शेतकरी समाधानी आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव टोमॅटोचे हब म्हणून ओळखले जाते? या ठिकाणी कसा आहे दर.
गेल्या काही दिवसांपासून देशात टोमॅटोला चांगला बाजार भाव मिळत आहे. गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील टोमॅटो बेल्ट यंदा उत्पादन कमी झाल्यामुळे टोमॅटोला दर मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात नारायणगाव टोमॅटोचा हब असलेले शहर आहे. नारायणगाव बाजार समितीत सोमवारी टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेटला 2700 रूपयांपर्यंत दर मिळत आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या समाधान दिसत आहे.
बाजार समितीत टोमॅटोची आवक वाढली आहे. आवक वाढल्यामुळे बाजारभाव कमी झाले आहेत. नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोला आतापर्यंतचा उच्चांकी 3500 रूपये क्रेटला भाव काही दिवसांपूर्वी मिळाला होता. परंतु आता आवाक वाढल्यामुळे दर कमी झाले आहेत. पुढच्या काळातही बाजार भाव असेच टिकून राहतील, असा अंदाज शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने टोमॅटोचे दर कमी करण्यासंदर्भात पावले उचलली आहेत. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ म्हणजेच नाफेडमार्फत टोमॅटो विकत घेण्याची योजना सरकारने तयार केली आहे. नाफेड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यातून टोमॅटोची खरेदी करुन ग्राहकांना सवलतीच्या दरात देणार आहेत. यामुळे ग्राहकांना कमी दरात टोमॅटो मिळणार असून शेतकऱ्यांनाही चांगले दर मिळणार आहेत.
यंदा टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शेतातून टोमॅटो चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यासंदर्भात गुन्हाही दाखल झाला आहे.
हे ही वाचा
शेतकऱ्याच्या टोमॅटोची झाली चोरी, पुणे पोलिसात प्रथमच टोमॅटो चोरीची तक्रार