पुणे | 11 सप्टेंबर 2023 : भारतीय शेतकऱ्यांसमोर संकटे कधीच संपत नाही. कधी अतिवृष्टीचा फटका बसतो, कधी दुष्काळाच्या फेऱ्यात शेतकरी येतो. यंदा मान्सूनने ऑगस्ट महिन्यात चांगलीच ओढ दिली होती. निसर्गाच्या चक्रातून बाहेर पडल्यावर शेतकऱ्यांच्या शेतमालास दर मिळत नाही. कांदा आणि टोमॅटो पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या समस्यांना वारंवार सामोरे जावे लागते. महिन्यापूर्वी भाव खाललेल्या टोमॅटो आता शेतकऱ्यांना रडवत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि नारायणगावमध्ये टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय.
मागील महिन्यात आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोचे दर तेजीत होते. कधी नव्हे असा दर यंदा टोमॅटोला मिळाला होता. त्यावेळी 3000 ते 2500 रुपये प्रति क्रेट दराने टोमॅटो विकला गेला होता. यामुळे केंद्र सरकारने टोमॅटो दर नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे अवघ्या महिन्याभरातच टोमॅटोसह भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आता टोमॅटो रस्तावर फेकण्याची वेळ नारायणगाव आणि इंदापूर येथील शेतकऱ्यांवर आली.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील शेतकरी सुखदेव बारवकर यांच्यावर टोमॅटो रस्तावर फेकण्याची वेळ आली. 2500 रुपये दर असलेल्या टोमॅटोचा क्रेट आता 70 रुपये प्रतिक्रेटने विकला जात आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने त्वरित टोमॅटोची आयात केली अन् भावातील घसरण थांबवली. आता टोमॅटोला भाव नसतानाही सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे.
टॉमेटोला पुन्हा मातीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहे. नारायणगाव बाजार समितीमध्ये सरकारचा निषेध व्यक्त केला गेला. भाव पडल्यामुळे हातात टोमॅटो घेऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या. गेल्या दीड महिन्याच्या तुलनेत आता फळभाज्यांचे दर कमी झाले आहेत. भाज्यांमध्ये भेंडी, कारले, पत्ताकोबी २५ ते ३० रुपये किलोने मिळत आहे. शिमला मिरची, शेवगा, गाजर, तोंडली ३० ते ४० रुपये किलोवर स्थिर आहे.
हे ही वाचा…