पुणे : गोपीचंद पडळकर ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली विषारी कीड आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी आणि विशेषत: पवार कुटुंबीयांवर अत्यंत खालच्या थराला जाऊन टीका करतात. यावरून राष्ट्रवादी (NCP) आक्रमक झाली असून प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मागील काही दिवसांत कांद्याचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असो की अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आणि त्यासंबंधीचा वाद या विषयांवरून गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) शरद पवारांना लक्ष्य केले होते. तर पवारांवर टीका करताना अनेकवेळा त्यांचा तोल जात असल्याचे दिसून येते. यावरून राष्ट्रवादीने त्यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर जशासतसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही दिला आहे.
गोपीचंद पडळकर ही राज्याच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. जास्तीत जास्त अश्लाघ्य कसे बोलता येईल आणि स्वतः पहिल्यांदा बोललेले रेकॉर्ड पुढच्यावेळी अजून घाणेरडे बोलून कसे मोडता येईल, असा या व्यक्तीचा प्रयत्न असतो. संघाचे आणि भाजपाचे म्हणवणारे हे आमदार कोणत्याही राजकीय, सामाजिक प्रश्नावर न लढता राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जास्तीतजास्त कसे अश्लाघ्य बोलता येईल, याची वारंवार प्रॅक्सिसच करत असतात. अशा प्रकारांची वक्तव्य करून हे भाजपाची आणि स्वतःची लायकी दाखवत असतात. शरद पवारांसारख्या सूर्यावर थुंकल्याने ती थुंकी आपल्या तोंडावर पडेल, हे का पडळकरसारख्यांना कळत नाही, असा सवाल करत तुमची अश्लाघ्य बडबड बंद करा, ही बडबड थांबली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जसास तसे उत्तर देईल, असा इशारा देखमुख यांनी दिला आहे.
#Pune : तुमची अश्लाघ्य बडबड थांबवा, अन्यथा…; राष्ट्रवादीच्या प्रदीप देशमुखांचा गोपीचंद पडळकर यांना पुण्यात इशारा, म्हणाले…@NCPspeaks @GopichandP_MLC #ncp #gopichandpadalkar #Politics
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/SvuPmWDixm— TV9 Marathi (@TV9Marathi) June 6, 2022
अलिकडेच गोपीचंद पडळकर यांनी कांद्याच्या प्रश्नावरून नाशिकमध्ये शरद पवारांवर टीका केली होती. नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्नावर आंदोलन करत असताना शेतकऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यावेळेस शेतकऱ्यांनी रक्त न सांडता इकडे येऊन शरद पवार यांच्या ###वर लाथ घाला, असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील. त्यानंतर त्यांना कांद्याचा वास द्या, ते शुद्धीवर आल्यानंतर कांद्याचे दर वाढतील, असे बाळासाहेब म्हणाले होते, आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचे पालन करणार का, असा सवाल करून पडळकर यांनी वाद ओढवून घेतला आहे.