पुणे : राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका यामागे भाजपा आहे. मुख्यमंत्रीपदाची आस लावून बसलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सर्व करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेली भोंगे, हिंदुत्व यावर रुपाली पाटील (Rupali Patil) पुण्यात बोलत होत्या. त्यांनी यासर्वांचे खापर भाजपावर फोडले आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. बाबरी पाडली तेव्हा देवेंद्र फडणवीस तुमचे वय काय होते, असा सवालही रुपाली पाटील यांनी फडणवीस यांना केला आहे. तर राज ठाकरे यांनी काल केलेल्या भाषणात राष्ट्रवादीवर विशेषत: शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती, त्यालाही रुपाली पाटील यांनी चोख प्रत्त्युत्तर दिले आहे.
काही प्रवृत्तींचा राज्यात दंगली घडवण्याचा कट आहे. मात्र राज्यात दंगली होणार नाहीत. यासाठी महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे, असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत. राज ठाकरेंच्या भाषणात अनेक मुद्दे आले, ज्याची तपासणी पोलीस करत आहेत. त्याचबरोबर पोलीस मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवत आहेत. राज ठाकरे यांच्या भाषणामुळे जर काही घटना घडलीच तर कारवाई होणार, असेही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
शरद पवार जातीयवादी असल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी काल केला होता. त्यावर राष्ट्रवादीत सर्वच धर्माचे लोक असल्याचे सांगत राज ठाकरेंना रुपाली पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. जातीजातीत विष कालवण्याचे काम शरद पवार यांनी केले. बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण असल्यामुळे त्यांना त्रास देण्यात आला, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यांचा मुद्दा खोडून काढत रुपाली पाटील यांनी शरद पवार जातीयवादी नाहीत. राष्ट्रवादी पक्षात सर्व जातीचे आणि धर्माचे लोक आहेत, असे सांगितले.
शरद पवारांना हिंदू या शब्दाचीच मुळात अॅलर्जी आहे. प्रत्येक वेळेला बोलताना शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, असे म्हणतात. होय तो आहेच. पण त्याआधी तो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले. पण कधीही पवार साहेबांच्या तोंडी कधी शिवाजी महाराजांचे नाव येत नाही. मी बोललो तेव्हापासून ते शिवाजी महाराजांचे नाव घेत आहेत, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला. याचबरोबर जेम्स लेन, बाबासाहेब पुरंदरे, रामदास स्वामी या विषयांवरूनही राज ठाकरे यांनी शरद पवारांवर शाब्दिक हल्ला चढवला होता.