क्या हुआ तेरा वादा? पुण्यात राष्ट्रवादी भाजपला वायद्यांची आठवण करुन देणार

| Updated on: Oct 14, 2021 | 9:15 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोशल मीडियावर भाजपला 'क्या हुआ तेरा वादा'? असा सवाल करत त्यांच्या वायद्यांची आठवण करुन देणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली आहे.

क्या हुआ तेरा वादा? पुण्यात राष्ट्रवादी भाजपला वायद्यांची आठवण करुन देणार
क्या हुआ तेरा वादा? पुण्यात राष्ट्रवादी भाजपला वायद्यांची आठवण करुन देणार
Follow us on

पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय घडामोडींना वेग येताना दिसतोय. पुण्यात सर्वच पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: पुण्यात पक्षबांधनीसाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वात पुण्यात आंदोलन देखील होणार आहे. दुसरीकडे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षही आपापल्या परीने तयारीला लागले आहेत. या सर्व घडामोडी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोशल मीडियावर भाजपला ‘क्या हुआ तेरा वादा’? असा सवाल करत त्यांच्या वायद्यांची आठवण करुन देणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली आहे.

प्रशांत जगताप नेमकं काय म्हणाले?

“पुणेकरांना मोठमोठी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात गेल्या साडेचार वर्षात पायाभूत सुविधादेखील पुरवण्यास अपयशी ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला आम्ही त्यांनी केलेल्या वायद्यांची आठवण म्हणून प्रश्न विचारणार आहोत. त्यासाठी आम्ही समाजमाध्यमांच्या माध्यमातून ‘क्या हुवा तेरा वादा’ ही प्रश्नमालिका सुरु करत असून या माध्यमातून भाजपच्या अपयशाचा पाढा वाचणार आहोत”, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

‘भाजपला वायद्यांची आठवण करुन देणार’

“भाजपच्या वायद्यांची आठवण करुन देणाऱ्या प्रश्नमालिकेविषयी माहिती देताना जगताप म्हणाले, ‘पुणे महापालिकेत पुणेकरांनी भाजपला ऐतिहासिक बहुमत दिले होते. मात्र या बहुमताचा वापर पुण्याच्या विकासासाठी करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र भाजपचे वायदे म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात…’ या म्हणीप्रमाणे ठरले आहेत. भाजपच्या या ‘मुंगिरीलाल’च्या स्वप्नांनी जाणीव पुणेकरांना करुन देणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्तव्य आहे”, असं प्रशांत जगताप म्हणाले.

‘पुणेकर भाजपला निवडणुकीतून उत्तर देतील’

“पुणेकरांना 2017 च्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आश्वासनांची खैरात केली होती. मोफत बस सेवा, चकाचक आणि खड्डेमुक्त रस्ते, गतीमान प्रशासन अशी मोठी यादी भाजपने पुणेकरांसमोर वाचली होती. पुणेकरांनीही भाजपच्या पारड्यात मते टाकली, मात्र प्रत्यक्षात पुणेकरांचा भ्रमनिरास आणि विश्वासघात झाला. त्यामुळे पुणेकर या विश्वासघाताला आगामी निवडणुकीतून उत्तर देतील, हे स्पष्ट आहे”, असंही जगताप यावेळी म्हणाले.

राज ठाकरे पुण्यात आंदोलन करणार

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात मोर्चेबांधणी करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता थेट पुण्यातच आंदोलन करणार आहेत. तळजाई टेकडीवरील प्रकल्पाला विरोध करण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात मोठं आंदोलन होणार असून त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी या आंदोलनाची माहिती दिली. तळजाई टेकडीवर प्रकल्प होत असून या टेकडीवर एक प्रकारचं अतिक्रमणच केलं जाणार आहे. त्याला आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात येत्या 24 तारखेला हे आंदोलन होणार आहे. सकाळी 7 वाजताच या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

पुणे विमानतळ 14 दिवसांसाठी बंद, गैरसोय टाळण्यासाठी खासगी हेलिकॉप्टर सेवा, मुंबईला जाण्यासाठी खर्च?

पुण्यात रिक्षाच्या भाडेदरात 8 नोव्हेंबरपासून वाढ, 1.50 किलोमीटरसाठी 20 रुपये मोजावे लागणार