योगेश बोरसे, पुणे : पुणे शहरातील बॅनर नेहमी चर्चेचा विषय असतो. राज्यातील राजकारणात रविवारी पुन्हा एक नवीन भूकंप झाला आहे. त्याचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटू लागले आहेत. राज्यात कुठे शरद पवार यांना समर्थन दिले जात आहे तर कुठे अजित पवार यांचे समर्थन केले जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या पुणे जिल्ह्यात कोण कोणासोबत आहेत? हा विषय चर्चेचा आहे. पुणे शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून बॅनर लावून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. या बॅनरची चर्चा पुणे शहरात सुरु आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत अजित पवार यांच्यांसोबत जाणार असल्याचे सांगितले. पुणे जिल्ह्यातील कोणते आमदार अन् कार्यकर्ते कोणासोबत आहेत, हे स्पष्ट होऊ लागले आहे. पुणे शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्या माध्यमातून शरद पवार यांचे समर्थन केले गेले आहे.
वाट आहे संघर्षाची…
म्हणून थांबणार कोण?
सह्याद्री सोबत आहे
महाराष्ट्र सारा
दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा…
मग संघर्षाला घाबरतंय कोण?
लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच…
पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष समीर उत्तरकर अन् कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरुनानी यांच्या वतीने हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. मी सदैव पवार साहेबांसोबत असा उल्लेख देखील या बॅनरवर करण्यात आलेला आहे. पुणे शहर अन् कोथरूड परिसरात सर्वत्र हे बॅनर्स लावण्यात आलेले आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी कराड दौऱ्यावर गेले आहे. प्रितीसंगमावर असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाला जाऊन ते अभिवादन करणार आहेत. यामुळे कराडमध्ये ठिकठिकाणी मी शरद पवारांसोबत असे बॅनर लावण्यात आले आहे. कराड उत्तरचे आमदार माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे शरद पवार यांच्यासोबत आहेत.
हे ही वाचा
पुणे येथील मोतीबागेत शरद पवार यांच्यासोबत कोण? पवारांसोबत दिसला फक्त हा नेता