पुणे : मुख्यमंत्री नाही तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन आल्यावर यंत्रणेची धावपळ उडते. काही महिन्यांपूर्वी पुणे ससून रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन केल्याचा प्रकार घडला होता. परंतु अधिष्ठातांना संशय आला. मग त्यांनी खात्री करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात फोन लावला अन् सर्व प्रकार उघड झाला. आता पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करत असल्याचे सांगण्यात आले…मग हा प्रकार स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच उघड झाला.
नेमके काय घडले
हॅलो, मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय, तुमच्या महाविद्यालयात आमचा एक प्रवेश करून द्या, असे फोन पुणे शहरातील काही महाविद्यालयात गेले. मग मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतर काम तर होणारच..फोन करणाऱ्या व्यक्तीने पुणे शहर अन् परिसरातीलच नाही तर बंगळूरमधील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना या पद्धतीने प्रवेश मिळवून दिले. मग हे प्रवेश मिळवण्यासाठी त्यांच्यांकडून पैसे घेतले. पुणे आणि पिंपरी -चिंचवड शहरातील हिंजवडी, लवळे, पुणे आणि बंगळूर येथे सिंबायोसिस आणि डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये चार ॲडमिशन मिळवून देण्यासाठी त्या व्यक्तीने मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे भासवले अन् विद्यार्थ्यांचे प्रवेश करुन घेतले.
कसा उघड झाला प्रकार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अन्य काही मंत्री एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारीसुद्धा होते. शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि बहुसंख्य कॉलेजचे संस्थापक, चालक देखील यावेळी आले होते. त्यावेळी त्यांनी तुमच्या कार्यालतील राहुल राजेंद्र पालांडे यांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना कॉलेजला प्रवेश दिल्याचे सांगितले. मात्र, मंत्रालयातील कोणत्याही अधिकाऱ्याने कधीही कोणत्याही कॉलेज व्यवस्थापनाला फोन केला नसल्याचे उघड झाले.
काय केला त्याने प्रकार
पालांडे याने त्याच्या फोन नंबरला ‘ट्रू कॉलर’वर सीएमओ ऑफिस महाराष्ट्र शासन मुंबई असे स्वतः सेव्ह केले होते. त्यामुळे तो ज्यांना फोन करतो त्या व्यक्तीच्या ‘ट्रू कॉलर’वर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला, असे वाटत असते. पालांडे याने व्हॉट्सॲप डीपीवर शासनाचे बोध चिन्ह ठेवले. इतकेच नाही तर त्याच्या फेसबूकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनेक कॅबिनेट मंत्री यांच्याबरोबरचे फोटो आहेत. यामुळे तो सरकारी अधिकारी असल्याचे अनेकांना वाटते.
अखेर गुन्हा दाखल
पालांडे यांनी केलेला प्रकार उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानंतर राहुल राजेंद्र पालांडे (वय ३१, रा. चिंचवड) याला अटक करण्यात आली. न्यायालयाने पालांडे याला २९ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.
हे ही वाचा
पुणे ससून रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन? अन् सर्वच लागले कामाला