प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 26 सप्टेंबर 2023 : लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीची रणनीती ठरवताना दिसत आहेत. अगदी छोट्या पक्षांनीही जोर बैठका सुरू केल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीने तर काल लोकसभेच्या 48 जागांची तयारी सुरू केल्याचं विधान केलं आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्या आधीच वंचितने त्यांची तयारी सुरू केली आहे. तर, दुसरीकडे भाजपनेही अधिकृतपणे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी एक समिती स्थापन केली असून प्रत्येक जिल्ह्यावर लक्ष वेधलं आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी भाजपने एक व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. या समिती अंतर्गत विधानसभा संयोजकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संयोजकांवर कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. काय केलं पाहिजे आणि काय करू नये याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या संयोजकांना काही टारर्गेटही देण्यात आले आहेत. तसेच त्यांनी त्यांचं लक्ष पूर्ण केलं की नाही याचा आढावाही घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या विधानसभा संयोजकांना मतदारसंघात नियोजन करण्यास सांगितलं आहे. पुणे जिल्ह्यातही विधानसभा संजोयक नेमायला सुरुवात केली आहे. या संयोजकांना लवकरच भाजपकडून निवडणूक कार्यक्रम दिला जाणार आहे. विधानसभेच्या माध्यमातून भाजपने लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. एक एक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणे म्हणजे लोकसभा मतदारसंघच पिंजून काढण्यासारखं आहे. त्यामुळे छोट्या छोट्या जबाबदाऱ्या देऊन भाजपकडून कामाचं वाटप केलं जात आहे.
प्रत्येक लोकसभा निवडणुकीत भाजप अधिक बारकाईने काम करत असते. अनेक पातळीवर पक्षाचं काम वाढवण्याचं काम केलं जातं. बुथपासून लोकसभा मतदारसंघापर्यंतचं भाजपचं प्लानिंग असतं. आता विधानसभा आणि लोकसभेसाठी भाजपने जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्या जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम दिला जाणार आहे. जास्तीत जास्त मतदार कसा भाजपकडे येईल याची खबरदारी घेतली जात आहे, असं सूत्रांनी सांगितलं.