अभिजित पोते, पुणे : फळांचा राजा आंबा. मग त्यात हापूस आंबा म्हणजे खव्वयांसाठी पर्वणीच असते. परंतु हापूसचे दर तुमच्या आवक्यात येत नाही. यामुळे अनेकांना हवे, असूनही तो घेता येत नाही. परंतु, थांबा हापूस आंबा खरेदीसाठी तुम्हाला आताच सर्व पैसे द्यावे लागणार नाही. तुमच्यासाठी नवीन ऑफर सुरु केलीय. महाराष्ट्रातील पुण्यातील एका व्यावसायिकाने आंबा विक्रीचा अनोखा मार्ग शोधला आहे. ज्या अंतर्गत ग्राहकांना EMI वर हापूस आंब्याची पेटी खरेदी करता येणार आहे. ईएमआयवर आंबा देण्याची पुण्यातील व्यावसायिकाची कल्पना आश्चर्यकारक आहे.
कोणी केली कल्पना
पुणे शहरातील गौरव सणस या अवलियाने आंबा चक्क EMI वर विकायला सुरुवात केली आहे. नैसर्गिकरित्या पिकवलेला देवगड हापूस आंबा ईएमआयवर दिला जाणार आहे. त्यांनी पेटीएमशीही करार केला आहे. सामान्य माणूस महागडे आंबे खरेदी करु शकत नाही, त्यामुळे ही कल्पना गौरवने पुढे आणली आहे. तुम्ही आंबे खरेदी केल्यानंतर तुमच्या पूर्ण रकमेचे हप्ते पाडून तुम्ही तुमच्या आंब्याची पेमेंट पूर्ण करू शकता. विशेष म्हणजे अगदी छोट्या रकमेचे देखील EMI तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जसे फ्लॅटचे, गाडीचे आणि मोबाईलचे EMI पाडून घेता अगदी तसंच आता तुम्हाला आंबा देखील EMI वर मिळणार आहे
बारा वर्षांपासून व्यवसाय
बारा वर्षांपासून आंबा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गौरव सणस यांचे पुण्यातील सनसिटी रोडवरील आनंद नगर परिसरात चॉकलेट आणि फटाके विक्रीचे दुकान आहे. या वर्षापासून त्यांनी आपल्या दुकानात ईएमआयवर आंबे विकण्यास सुरुवात केली आहे. काही ग्राहकांनी त्याच्याकडून प्रत्येकी 30,000 रुपये किमतीचे आंबे खरेदी केले आहेत. त्यांना एका वर्षासाठी प्रत्येकी 2,500 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील. पुण्यातील अंबा विक्रेता व्यवसायिकाची भन्नाट कल्पना आहे.
काय म्हणतात गौरव सणस
गौरव सणस यांनी सांगितले की, लोक ईएमआयवर मोबाईल खरेदी करतात. कारण त्यांच्यांकडे पैसा नसतो. परंतु EMI मुळे त्यांना या गोष्टी सोप्या होतात. त्याच पद्धतीने माझ्या मनात कल्पना आली की EMI वरही आंबा विकता येईल. जर एखाद्या व्यक्तीने पाच हजार रुपयांचा आंबा खरेदी केला तर त्याला आठ महिने किंवा बारा महिन्यांच्या ईएमआयवर पैसे भरण्याची सुविधा मिळेल.
हे ही वाचा