उद्या थर्टी फर्स्ट नाईट आहे. अनेकांनी नव्या वर्षाचं जोरदार स्वागत करण्याचे प्लान्स आखले आहेत. यात पार्टीच प्लानिंग स्वाभाविक आहे. प्रत्येकाने आपआपल्या सोयीनुसार पार्टीच नियोजन केलं आहे. यात काही जण समुद्र किनारी, काही इमारतींच्या गच्चीवर, सोसायटीच्या आवारात, काही जण हॉटेलमध्ये तर काहींनी पबमध्ये संगीताच्या तालावर नव्या वर्षाच्या स्वागताचा बेत आखला आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना 2025 नव्या वर्षाच जोरदार स्वागत करण्याची अनेकांची इच्छा आहे. आता एका पबने नव्या वर्षाच्या स्वागत पार्टीच आमंत्रण देताना विचित्र कृती केली आहे.
या पबची ही कृती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात हा पब आहे. पब कल्चर हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार नसतं. बहुतांश उच्चभ्रू, श्रीमंता घरची मुलं पबमध्ये थर्टी फर्स्टच्या पार्ट्या करतात. आता पुण्यातील ‘हाय स्पिरीट’ या पबने नववर्ष स्वागताची पार्टी आयोजित केली आहे. ‘हाय स्पिरीट’ पबने या पार्टीच निमंत्रण देताना कंडोम आणि ORS च पाकीट पाठवलं आहे.
पबने असं का केलं?
तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट दिल्याचा दावा पबने केला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. कंडोम वाटणे हा गुन्हा नाही, असा पब व्यवस्थापनाचा दावा आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची पोलिसात तक्रार
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने या प्रकाराविरोधात पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. “पुण्यातील मुंढवा येथील हाय स्पिरिट कॅफे या रेस्टॉरंट कम पबने नववर्षानिमित्ताने नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना निमंत्रणे पाठवताना कंडोमच्या पाकिटांसह इलेक्ट्रा ओआरएस वितरित केले आहे. हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे,” असं या पत्रात लिहलं आहे. “अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती असून, समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचा धोका आहे,” असं सुद्धा या पत्रात नमूद केलं आहे.