शिरूर, पुणे : गेल्या काही महिन्यांपासून अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहे. हातात आलेले पीक अवकाळी पावसामुळे नष्ट झालेय. शासनाकडून पंचनामे केली जात आहे. यासंदर्भातील मदत देण्याच्या घोषणा झाल्या आहेत. परंतु सर्वच शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहचली नाही. शेतकरी संकटात असताना अजून पुन्हा नवीन संकट अधिकाऱ्यांनी निर्माण केले आहे. आता पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे.
काय घडली घटना
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ही घटना आहे. म्हसे गावच्या शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी सुरु केली होती. शेतातील कांद्याची काढणी सुरू असताना काढलेला कांदा शेतातच साठवला गेला. यावेळी शेतांमध्ये पाणी येऊ लागेल. हे पाणी अवकाळी पावसाचे नव्हते. तर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शेतात कालव्याचे पाणी घुसले. मीना शाखा कालवामधून म्हसे गावच्या तळ्यात पाणी नेले जात होते. परंतु कालव्याची सफाई झाली नसताना पाणी सोडण्यात आले. यामुळे कालव्याचे पाणी शेतात घुसू लागले. कालव्यामध्ये कचरा अडकल्याने पाणी शेतात घुसले.
या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान
शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या कांद्यातही पाणी घुसल्याने कांदा भिजला. यामुळे कांद्याचे मोठ नुकसान झाले. म्हसे येथील शेतकरी निळू चोरे, रवी सदाफुले, विशाल ज्ञानेश्वर चोरे यांचे नुकसान झाले. त्यांच्या शेतातील कांदा पीक वाया गेले. कालव्याचे पाणी लवकर कमी झाले नाही तर अजूनही शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
भरपाईची मागणी
अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तत्काळ पंचनामा करावा आणि नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
त्यानंतरही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
रविवारी सकाळी शेतात पाणी आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी शेतात पाणी येत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. तसेच घटनास्थळी पाहणी करण्यासाठी कोणी आले नाही. अधिकाऱ्यांनी त्वरित पावले उचलली असती तर शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या कष्टावर पाणी फिरल्याने तात्काळ नुकसान भरपाई करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत .
हे ही वाचा
Video : तापमान वाढले अन् मुंबईतील AC लोकलची अशी कशी झाली अवस्था
Video | उन्हामुळे हैराण झालेल्या युवकाची भन्नाट आयडीया झाली व्हायरल