पुणे : ऐन उन्हाळ्यात राज्यात वीज दरवाढीचा शॉक (Electricity Prices Hike) लागू शकतो. हा शॉक लहान नाही अगदी ४४० व्होल्टचा हा शॉक असू शकतो. यंदा वीज दरात वाढीचा प्रस्ताव महावितरणने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2025 साठी हा प्रस्ताव आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व शेतकरी सर्वच वर्गासाठी वीजदारात मोठी वाढ होणार आहे. त्यावर 31 मार्च रोजी निर्णय होणार आहे. यामुळे वाढीव वीज बिल एप्रिलपासून मिळण्याची शक्यता आहे.
किती असणार दरवाढ
पुढील दोन वर्षांसाठी तब्बल ३७ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महावितरणने दिला आहे. ही वाढ म्हणजे सरासरी दोन रुपये ५५ पैसे प्रतियुनिट आहे. त्यावरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यावर ३१ मार्च रोजी निर्णय होणार आहे. या निर्णयास आयोगाकडून मान्यता मिळाली तर एक एप्रिलपासून वाढीव वीजबिल तुम्हाला येणार आहे.
का केली मागणी
महावितरणने २६ जानेवारीला ३७ टक्के वीजदरवाढीची मागणी आयोगाकडे सादर केली. महावितरणनुसार २०१९-२० पासून २०२४-२५ या सहा वर्षांतील ६७ हजार ६४४ कोटी रुपयांच्या महसुली तुट आहे. या तुटीची भरपाई करण्याच्या मागणी करत दरवाढ केली जाणार आहे. त्यासाठी २०२३-२४ साठी १४ टक्के व २०२४-२५ साठी ११ टक्के दरवाढ करण्याची मागणी केली आहे. यामुळे प्रत्यक्षात दरवाढ ३७ टक्के होणार आहे.
आयोगासमोर जनसुनावणी
महावितरणसह खासगी वीज कंपन्यांनी दिलेल्या वाढीच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर जनसुनावणी पार पडली आहे. शुक्रवारी 31 मार्चरोजी वीज नियामक आयोग याबाबतचा आदेश जारी करणार आहे. घरगुती वीज ग्राहकांच्या श्रेणीत, अदानी इलेक्ट्रिसिटीने 2023-24 साठी 2 ते 7 टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण 2024-25 या कालावधीसाठी कंपनीने वीज दरात 3 आणि 4 टक्के कपातीचा प्रस्ताव ठेवला आहे. टाटा पावरने 2023-24 या चालू वर्षासाठी 10 ते 30 टक्क्यांच्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे.
मुंबईत वीज वितरण करण्यासाठी तीन कंपन्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड( Adani Electricity Mumbai Limited), टाटा पावर आणि बेस्ट इंटरप्राइजेस यांचा समावेश आहे. या तीनही वीज वितरण कंपन्यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला दरवाढीचा प्रस्ताव सोपवला आहे. या प्रस्तावावर आयोगासमोर ऑनलाईन सुनावणी झाली आहे. आता निर्णय ३१ मार्च रोजी होणार आहे.